Saturday, November 16, 2024
Homeराजकीयनिवडणूक आयोग ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्याच्या विचारात

निवडणूक आयोग ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्याच्या विचारात

नेवासा l तालुका प्रतिनिधी l Newasa

राज्य निवडणूक आयोगाने दि.14 सप्टेंबर रोजी अहमदनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, जळगाव, नंदुरबार, पुणे, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, नागपूर,वर्धा व गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून ग्रामपंचायत निवडणुका घेणे बाबतची माहिती मागविली आहे.

- Advertisement -

निवडणूक आयोगाने त्यात म्हंटले आहे की, राज्यातील वरील 19 जिल्ह्यातील माहे एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित 1566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.या कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक हा दि .17 मार्च 2020 असा होता. राज्यात सध्या करोना विषाणूमुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीचा विचार करता सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे कामकाज ( प्रभाग रचना , मतदार यादी व प्रत्यक्ष निवडणूक ) दि.17मार्च 2020 रोजी ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर पुढील आदेश होईपर्यंत स्थगित करण्यात येत असल्याचे आयोगाच्या उक्त संदर्भाधीन पत्रान्वये आदेशित करण्यात आले . त्यामुळे उक्त निवडणूक कार्यक्रम नामनिर्देशनपत्र छाननीच्या टप्प्यावर स्थगित करण्यात आलेला आहे.

लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणण्या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी निर्देश जारी करण्यात आलेले आहेत. या अनुषंगाने राज्यातील सद्यस्थितीचा अंदाज घेऊन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्याची बाब राज्य निवडणूक आयोगाच्या विचारार्थ आहे . तरी आपल्या जिल्ह्यातील दि.31 मार्च 2020 रोजीचे मतदान तहकूब केलेल्या ग्रामपंचायतींपैकी कोणत्या ग्रामपंचायतीतील हद्दीतील करोना परिस्थिती आटोक्यात आहे,जेथे मतदान घेणे शक्य आहे याबाबतचा विस्तृत अहवाल दि.21 सप्टेंबर 2020 पर्यंत आयोगास सादर करावा , जेणेकरुन आयोगाला निवडणूकीबाबत निर्णय घेणे शक्य होईल असे राज्य निवडणूक उपायुक्त अविनाश सणस यांनी कळविले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या