Sunday, May 5, 2024
Homeमुख्य बातम्यापंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस; नेमकं कारण काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस; नेमकं कारण काय?

नवी दिल्ली | New Delhi

देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असल्याने सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून जोरदार प्रचार चालू आहेत. या प्रचारसभांमध्ये सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (Narendra Modi) राहुल गांधींचा (Rahul Gandhi) समावेश आहे. नुकताच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी काँग्रेसने (Congress) आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. त्यावेळी या जाहीरनाम्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीका केली होती. त्यावरून राहुल गांधी यांनी देखील निशाणा साधला होता.

- Advertisement -

यानंतर मोदींच्या टीकेतील वक्तव्याविरोधात काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे (Election Commision) तक्रार दाखल केली होती. त्यानंतर भाजपनेही (BJP) राहुल गांधी यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली होती. समाजात द्वेष पसरवणे, धार्मिक तेढ निर्माण करणे, जात, धर्म आणि भाषेच्या आधारे भेदभाव करणे अशा प्रकारे आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात केला होता. या सर्व राजकीय घडामोडींवरून आता केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही नेत्यांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांना आता निवडणूक आयोगाला उत्तरे द्यावी लागणार आहेत.

निवडणूक आयोगाने सोमवार (दि.२९ एप्रिल) रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत भाजप अध्यक्ष जे पी नड्डा (JP Nadda) आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना नोटिशीला उत्तर देण्यास सांगितले आहे. निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधी कायद्या अनुच्छेद ७७ चा वापर करत स्टार प्रचारकांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी पक्षाच्या अध्यक्षांना जबाबदार धरले आहे. त्यानुसार, आयोगाने दोन्ही अध्यक्षांना नोटीस पाठवली आहे. या नोटिशीत आयोगाने म्हटले की, राजकीय पक्षांची ही जबाबदारी आहे की त्यांनी आपले उमेदवार आणि स्टार प्रचारकांना संयमित भाषेचा वापर करण्यास सांगावे. मोठ्या पदावर बसलेल्या लोकांच्या भाषणाचा मोठा प्रभाव लोकांवर पडत असतो. त्यामुळे अशा लोकांनी सावधगिरी बाळगायला हवी, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, आतापर्यंत निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंग झाल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानंतर निवडणूक आयोगाने सर्वांना संयम ठेवून वक्तव्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यातच आता नुकतेच प्राप्त झालेल्या नोटिसीवर काँग्रेस आणि भाजप काय उत्तर देतं हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या