नवी दिल्ली | New Delhi
केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी आज दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली. त्यानुसार दिल्ली विधानसभेच्या एकूण ७० जागांसाठी ०५ फेब्रुवारी २०२५ रोजी मतदान होणार आहे. तर ०८ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहेत. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता १० जानेवारी २०२५ पासून सुरुवात होणार असून अर्ज भरण्याची शेवटची मुदत १७ जानेवारीपर्यंत असणार आहे. तर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २० जानेवारी असणार आहे.यावेळी निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत झालेल्या वाढीसह विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांना उत्तर दिले.
यावेळी ते म्हणाले की, “मतदार याद्यांत (Voter List) फेरफार, काही मतदारसंघात ५० हजार मतदार वाढले, मतदानाची मुदत संपल्यानंतर ७६ लाख मतदान वाढले असे आरोप केले गेले. मात्र, हे सर्व आरोप निराधार आहेत. मतदानाची वेळ जरी सहा वाजेपर्यंत असली तरी रांगा मोठ्या प्रमाणावर असल्याने कायद्याप्रमाणे विहित वेळेत आलेल्यांचे मतदान नोंदवून घेणे हे निवडणूक आयोगाचे काम आहे. त्यानुसार पाच ते सहा या वेळेत आलेल्या मतदारांचे मतदान आम्ही नोंदवून घेतले. आपण लाईनमध्ये उभा राहा, तुमचं मतदान नोंदवलं जाईल, अशी खात्री निवडणूक अधिकारी वेळोवेळी मतदारांना देतात.त्यानंतर त्यांचे मतदान नोंदवून घेतले घेऊन त्यांना १७ सी फॉर्म दिले जातात.अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे साडेपाच नंतर मतदान केंद्रावर आलेल्या मतदारांना स्लीप दिली जाते”, असे स्पष्टीकरण वाढीव मतदानाच्या काँग्रेसच्या आक्षेपाला राजीव कुमार यांनी दिले.
तसेच सहा ते अकरा दरम्यान आठ टक्के मतदान (Voting) वाढविल्याचा आरोप आमच्यावर केला जात आहे. परंतु निवडणूक निर्णय अधिकारी साऱ्या मशिनला घेऊन डिपॉसिट केंद्रावर जातात. सगळेच निवडणूक निर्णय अधिकारी सात-साडे सातपर्यंत डिपॉझिट केंद्रावर पोहोचत नाही. कुणाकुणाला वेळ लागतो. तिथे मतदानाची अचूक टक्केवारी काढून शेवटी प्रसिद्धीपत्रक काढले जाते. कालच प्रसिद्धीपत्रक का काढले नाही, असा प्रश्न दुसऱ्या दिवशी विचारू नये म्हणून मतदान संपताच आम्ही प्रक्रिया पूर्ण करून आणि अंतिम टक्केवारी काढून प्रसिद्धीपत्रक जारी केले, असे राजीव कुमार यांनी सांगितले
पुढे ते म्हणाले की, “१७ सी फॉर्म भरल्यानंतर एजंटच्या हातात त्याची कॉपी दिली जाते. साडे दहा लाख बूथवर चार एजंट म्हटले तरी ४० लाख फॉर्म दिले जातात. महाराष्ट्रात १ लाख बूथ आहेत, तर एजंट्सना ४ लाख १७ सी फॉर्म दिले जातात. एका तासात ते फॉर्म बदलता येणं शक्य आहे का? प्रत्येक उमेदवार (Candidate) १७ सी फॉर्म त्यांच्या एजंटकडून गोळा करतात. त्यांना माहिती असतं कुठे किती मतदान झाले आहे? ६ वाजता मतदान संपल्यावर अर्ध्या तासात त्याची माहिती अपडेट होत नाही. जी माहिती अपडेट होते ती फॉर्म १७ सी वर दिलेली असते तशीच असते, कुणीही ते चेक करावे. मतदानात आणि मतमोजणीतील मतांमध्ये फरक असल्याचे काहींनी म्हटले. पण वोटर टर्नआऊटमध्ये पोस्टल मतदान नसते हे त्यांना समजलेच नाही. एखादे मशिन सुरू झाले नाही, मशिन सुरू होण्यात चूक झाली, मॉक पोलचा डेटा हटवला गेला नाही असं अपवादाने घडते. साडे दहा लाखात एक दोन मशिनला असं होऊ शकते. मतमोजणी पूर्ण झाल्यावर विजयी उमेदवाराचे मताधिक्क्य त्या मशिनमध्ये असलेल्या मतांपेक्षा जास्त असेल तर त्या मशिनचा डेटा मोजला जात नाही”,असेही आयुक्त राजीव कुमार म्हणाले.
नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका
विधानसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरे शिवसेना ठाकरे गटाचे औसा मतदारसंघातील उमेदवार दिनकर माने यांच्या प्रचारासाठी गेले असताना निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून त्यांची बॅग तपासण्यात आली होती . त्यावरुन, उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केला. तसेच, आत्तापर्यंत किती जणांची बॅग तपासली असा सवाल संबंधितांना केला. यावर आज निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी उत्तर देतांना ठाकरेंना टोला लगावला. ते म्हणाले की, “ईव्हीएममध्ये कोणत्याही त्रुटीचा कोणताही पुरावा नाही. त्यामुळे ईव्हीएममध्ये व्हायरस किंवा बग असण्याचा तसेच मतमोजणीमध्ये काही छेडछाड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. देशातील उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयाने सातत्याने हेच सांगितले आहे की, ईव्हीएम टेम्परिंगचे आरोप निराधार आहेत,” असे राजीव कुमार यांनी म्हणत नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका केली.
हेच लोकशाहीचे सौंदर्य
२०२० पासून एकूण ३० राज्यांमध्ये निवडणुका झाल्या आहेत. १५ राज्यांमध्ये वेगवेगळ्या पक्षांचे सरकार आले. हेच मूळात लोकशाहीचे सौंदर्य आहे. निष्पक्ष निवडणुकांचे हेच लक्षण आहेत. यावरून मतदार किती हुशार आहेत, हे स्पष्ट होते. मतदानाच्या सुरुवातीपासून निकाल लागेपर्यंत संपूर्ण पारदर्शकता राखली जाते, असेही ते यावेळी म्हणाले.