मुंबई । प्रतिनिधी Mumbai
शिवसेना ( Shivsena )अंतर्गत संघर्षात बाजी मारल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या सरकारला आज विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या (Assembly Speaker Election) निमित्ताने पहिल्या परीक्षेला सामोरे जावे लागत आहे. या निवडणुकीत भाजपचे राहुल नार्वेकर आणि शिवसेनेचे राजन साळवी आमने-सामने आहेत. अध्यक्ष निवडणुकीसाठी शिवसेना आणि शिंदे गटाने पक्षादेश (व्हीप) जारी केले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीवेळी कोणाचा व्हीप ग्राह्य धरला जाणार यावरून सभागृहात खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीच्या प्रक्रियेत बदल करण्याच्या अधिसूचनेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीला परवानगी दिली आहे. प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने राज्यपालांनी आघाडी सरकारला विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक खुल्या पद्धतीने घेण्यास परवानगी नाकारली होती.
मात्र नव्याने स्थापन झालेल्या एकनाथ शिंदे सरकारला अध्यक्ष निवडणूक घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना निवडणुकीला परवानगी कशी? या मुद्यावरून सभागृहात गदारोळ होऊ शकतो. शिवसेनेसोबतच्या सत्तासंघर्षात विधानसभा अध्यक्षांची भूमिका महत्वाची असल्याने शिंदे सरकारने सरकारच्या स्थिरतेसाठी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी आज आणि उद्या, सोमवार असे दोन दिवस विधानसभेचे विशेष अधिवेशन होत आहे.
अधिवेशनाच्या आजच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाईल. या पदासाठी भाजपने मुंबईतील आमदार आणि पूर्वाश्रमीचे शिवसैनिक राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीने शिवसेनेचे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरचे आमदार राजन साळवी यांना नार्वेकर यांच्या विरोधात उमेदवारी दिली आहे. शिवसेनेने शिंदे गटात सहभागी असलेल्या 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली असून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे शिंदे सरकारसाठी अध्यक्षपदाची निवडणूक महत्वाची आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली आजची निवडणूक पार पडेल.
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक खुल्या पद्धतीने होणार असून शिवसेनेच्या दोन्ही गटांनी जारी केलेल्या पक्षादेशावरून सभागृहात मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहे. शिवसेना मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी शिवसेनेच्या सर्व 55 आमदारांना सभागृहात उपस्थित राहून राजन साळवी यांनाच मतदान करावे, असा व्हीप जारी केला आहे. तर बंडखोर एकनाथ शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनीही व्हीप बजावला असून या गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आमच्याकडे दोन तृतीयांश बहुमत असल्याने आमचाच व्हीप लागू असेल, असा दावा केला आहे.16 आमदारांनी आमच्या व्हीपचे पालन केले नाही तर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.
शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना आधीच विधिमंडळ गटनेते पदावरून काढले आहे. आता पक्षनेते पदावरून त्यांची उचलबांगडी केली आहे. शिवसेनेने अजय चौधरी यांची विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी नियुक्ती केली असून त्याला झिरवाळ यांनी मान्यता दिली आहे. चौधरींच्या नियुक्तीला शिंदे गटाने विरोध केला असून आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता शिवसेना विधिमंडळ पक्ष नेमका कोणाचा? हा कळीचा मुद्दा बनला आहे.
या पार्श्वभूमीवर आज अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे डोळे लागले आहेत. महाविकास आघाडीने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदानाने न होता खुल्या पद्धतीने व्हावी, असा नियमात बदल केला होता. त्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची नियम समिती नेमण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल जुलै 2021 मध्ये सादर केला होता. मात्र आघाडीला त्या बदललेल्या नियमाखाली निवडणूक घेता आली नाही. आधी हा नियमबदल घटनेला अनुकूल आहे की नाही अशी हरकत राज्यपालांनी घेतली होती.
तो व्हीप लागू होत नाही : मुख्यमंत्री
आमच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे. संख्याबळ आमच्याकडे आहे. त्यामुळे सुनील प्रभू यांनी बजावलेला व्हीप आम्हाला लागू होत नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
काय चालले ते जनता जाणते : पाटील
आमची सत्ता असताना विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्या, असे राज्यपालांना सांगत होतो. मात्र त्यांनी निवडणूक लावली नाही. आता नवीन सरकार सत्तेत येताच अध्यक्षपदाची निवडणूक लावली आहे. यावरून काय चाललेय हे जनतेला दिसत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
मतदान न केल्यास अपात्रतेची कारवाई : साळवी
महाविकास आघाडीतर्फे विधानसभा अध्यक्षपदासाठी मी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मला विश्वास आहे की महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सर्व आमदार मलाच मतदान करतील आणि विजय आमचाच होईल. शिवसेनेने व्हीप बजावला असून बंडखोर आमदारांनी जर मला मतदान केले नाही तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाईल, असे अध्यक्षपदाचे उमेदवार राजन साळवी यांनी आज सांगितले.
विधानभवनाला छावणीचे स्वरूप; सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त
विधानसभेच्या दोन दिवसांच्या विशेष अधिवेशनासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस फौजफाट्यामुळे विधानभवनाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. विधानभवनाच्या चारही बाजूला पोलिसांचे कडे उभारण्यात आले असून विधानभवनात आमदारांव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश देण्यात येणार नाही.
सीआयएसएफला प्रवेश नाही
आज सकाळपासूनच विधानभवनाच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. या परिसराच्या चारही बाजूला पोलीस तैनात केले आहेत. रविवारी आणि सोमवारी सर्व प्रवेशद्वारांवर मुंबई पोलिसांचे कमांडो तैनात करण्यात येतील. बंडखोर आमदारांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) संरक्षण आहे. पण सीआयएफएसच्या जवानांना विधानभवनच्या आवारात प्रवेश करू दिला जाणार नाही. या ठिकाणी राज्य पोलीस दलाची सुरक्षा व्यवस्था आहे. विधानभवनाच्या चारही बाजूला सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.