नवीन नाशिक | प्रतिनिधी
नाशिकमध्ये सध्या निवडणुकांनी जोर पकडला आहे. सगळ्याच प्रभागातील उमेदवार जोमात प्रचाराला लागले आहे. उमेदवारांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरले जात आहे. असे असतानाच नाशिकमध्ये मात्र एक वेगळीच चर्चा दबक्या आवाजात ऐकू येत असून सध्या हीच चर्चा सर्वत्र होत आहे. परीसरातील एका प्रभागात “झेरॉक्स नगरसेवक” म्हणून ओळख असलेल्यावर दाबेली विक्रेत्याचे ३५० दाबेलीचे पैसे बुडवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून या घटनेची चर्चा परिसरात सुरू असून, संबंधित दाबेलीवाला न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभागातील एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी सदर झेरॉक्स नगरसेवकाने स्थानिक दाबेली विक्रेत्याकडून मोठ्या प्रमाणात दाबेली मागविल्या होत्या. उपस्थितांनी त्याचा आस्वाद घेतला आणि कार्यक्रमही संपला. सुरुवातीला “नंतर पैसे देतो”, उद्या पैसे देतो अशा आश्वासनांनंतर मात्र कार्यक्रम संपून अनेक महिने उलटूनही ३५० दाबेलीचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत, असा आरोप संबंधित विक्रेत्याने केला आहे.
दाबेलीवाल्याच्या म्हणण्यानुसार, अनेक वेळा नगरसेवकाच्या कार्यालयात जाऊन दाबेल्यांचे थकलेले पैसे अदा करावे यासाठी मागणी केली. पण, प्रत्येक वेळी “देतो ना”, “आज नाही, उद्या ये”, “सध्या अडचण आहे” अशी उत्तरे देऊन टाळाटाळ करण्यात आली. तर अनेक वेळा फोनही उचलले गेले नाहीत. लहान व्यवसायावर उपजीविका करणार्या या विक्रेत्यासाठी ही रक्कम मोठी असल्याने आर्थिक अडचण निर्माण झाल्याचे त्याने सांगितले.
या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. “सामान्य माणसाचे पैसे बुडवणारा लोकप्रतिनिधी कसा?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. एकीकडे लोकप्रतिनिधी विकास, पारदर्शकता आणि प्रामाणिकपणाच्या गप्पा मारतात, तर दुसरीकडे अशा घटना विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात, अशी प्रतिक्रिया काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली. तर या प्रकाराची सध्या नाशिकमधील व्हॉट्स ॲप ग्रुपवर देखील जोरात चर्चा सुरु आहे. दरम्यान महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा अधिकच चर्चेत आला आहे. दाबेलीवाला परिसरात मतदारांशी संवाद साधत त्याच्यावर झालेल्या अन्यायाची माहिती देत आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




