श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
बहुचर्चित भाजपा तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदाच्या निवडी अखेर जाहीर झाल्या. तालुकाध्यक्षपदी माळवाडगावचे माजी सरपंच बाबासाहेब चिडे तर शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक जितेंद्र छाजेड यांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान या निवडी नियमबाह्य असल्याने आम्हाला मान्य नाही, असे सांगत भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. तर तुमची काय मागणी असेल सांगा, त्या वरिष्ठांपर्यंत कळवू, असे निवडणूक प्रमुखांनी यावेळी सांगितले.
काल रविवारी येथील शासकीय विश्रामगृह येथे भाजपा तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी निवडणूक प्रमुख सुभाष वहाडणे, उपनिवडणूक प्रमुख योगेश गोंदकर, तालुकाध्यक्ष दीपक पटारे, शहराध्यक्ष मारुती बिंगले आदींसह पदाधिकार्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी तालुक्यातील कार्यकर्ते देखील उपस्थित होते. या बैठकीत तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदाची नावे जाहीर होताच उपस्थित कार्यकर्त्यांनी भाजपा पदाधिकार्यांच्या झालेल्या निवडी नियमबाह्य असून या आम्हाला मान्य नाही.
याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. तुम्हाला निवडी जाहीर करायच्या होत्या तर मुलाखती का घेतल्या? असा प्रश्न माजी तालुका सरचिटणीस प्रफुल्ल डावरे यांच्या सह अन्या निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांनी उपस्थित करत नाराजी व्यक्त केली. उपस्थित पदाधिकार्यांनी तुमचे जे म्हणणे असेल ते आम्हाला सांगा, ते आम्ही वरिष्ठांपर्यंत पोहच करु, असे आश्वासन देत कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका समोर ठेवून भाजपा पदाधिकार्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. गेल्या दोन महिन्यापासून सदर निवडी करण्यासाठी प्रक्रीया सुरु होती. दि. 28 मार्च रोजी येथील शासकीय विश्रामगृह येथे इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
यावेळी तालुक्यातील व शहरातील अनेक कार्यकर्त्यांनी मुलाखती देवून शहराध्यक्ष व तालुकाध्यक्ष पदासाठी आपलीच वर्णी लागणार? यासाठी मोर्चेबांधणी देखील केली होती. मुलाखतीनंतर तब्बल पंधरा दिवसानंतर निवडी जाहीर करण्यात आल्या. परंतू ज्यांनी मुलाखती दिल्या नव्हत्या, त्यांचीच नावे या पदासाठी जाहीर झाल्याने उपस्थित जुन्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप उसळला. अनेकांनी या निवडीला विरोध करत या निवडी नियमबाह्य असल्याचे सांगितले. या निवडी रद्द केल्या नाही तर आम्ही आत्मक्लेश आंदोलन करु, असा इशाराही दिला. परंतू उपस्थित पदाधिकार्यांनी कार्यकर्त्यांना शांत करत तुमची मागणी वरिष्ठांपर्यंत कळवू असे आश्वासन दिले. त्यामुळे भाजपा तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदाच्या झालेल्या निवडी वादाच्या भोवर्यात सापडल्याची चर्चा काल दिवसभर शहरात व तालुक्यात सुरु होती.