Friday, November 22, 2024
Homeनगरनिवडणुकीच्या धामधुमीत ऊस उत्पादक अडचणीत

निवडणुकीच्या धामधुमीत ऊस उत्पादक अडचणीत

काही ठिकाणी कारखाने सुरू तर काही ठिकाणी प्रतिक्षा || उसाला लागले तुरे

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

नगरसह राज्यात यंदा विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाचा मुहूर्त टळताना दिसत आहे. आधीच काही दिवस उशीरा सुरू झालेला गाळप हंगाम आणि विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी यात ऊस उत्पादक शेतकर्‍यांना फटका बसत असताना शेतकर्‍यांच्या उसाला तुरे फुटण्याची वेळ आली आहे. राज्यातील शंभर साखर कारखान्यांना साखर आयुक्त कार्यालयाने 15 नोव्हेंबरपासून गाळप परवानगी दिली आहे. त्यातील बहुतांश कारखाने सुरू होत असताना श्रीगोंदेमधील नागवडे आणि जगताप सहकारी साखर कारखानदार निवडणुकीच्या रिंगणात होते. यातील नागवडे सहकारी कारखान्याचा बॉयलर गुरूवार (दि.21) रोजी पेटला आहे. तर हिरडगावच्या गौरी शुगर या खाजगी कारखान्याने गाळपात आघाडी घेऊन सर्वात आधी गळीत हंगामाला सुरूवात केली. तर जगताप यांच्या (कुकडी) कारखान्यांच्या गाळप परवानगी प्रक्रिया सुरू आहे. यंदा तालुक्यात गौरी शुगर, नागवडे सुरू होत असताना कुकडी मात्र विलंबाने सुरू होणार असल्याचे दिसत आहे.

- Advertisement -

श्रीगोंदा तालुका तसा अर्धा बागायत आहे. घोड, भीमाच्या पट्ट्यात उसाच्या लागवडीमुळे ढोकराईच्या माळावर स्व. शिवाजीराव नागवडे त्याचे सहकारी यांनी श्रीगोंदा सहकारी साखर कारखाना उभारणी करत, या भागातील शेतकर्‍यांना आधार दिला. यानंतर कुकडी पट्ट्यात स्व. कुंडलिकराव जगताप यांनी कुकडी साखर कारखाना उभा केला. एवढे असताना गाळपाला ऊस बाहेर द्यावा, लागत असल्याने वाढते उसाचे क्षेत्र पाहून बबनराव पाचपुते यांनी देवदैठण आणि हिरडगाव येथे साईकृपा खाजगी कारखाना उभे केले. यात इंटिग्रेटेड म्हणून ओळख निर्माण केलेल्या साईकृपा हिरडगाव हा कारखाना उभा केला आणि तो चांगला चालला. मात्र, काही अडचणीमुळे हा कारखाना बंद राहिला. याचा परिणाम 2014 साली निवडणुकीत झाला. पण त्यानंतर मात्र कारखाना वेगवेगळ्या पद्धतीने पुन्हा सुरू करत. मागीलवर्षी बाबुराव बोत्रे पाटील यांच्या ग्रुपच्या माध्यमातून हिरडगाव कारखाना सुरू केला. त्याचे नामकरण आता गौरी शुगर करण्यात आले असून मागीलवर्षी दक्षिण नगर जिल्ह्यातील सर्वाधिक भाव गौरी शूगरने दिला. गाळपाला आलेली उसाचे पेमेंट वेळेवर दिले.

यामुळे गौरी शुगर हिरडगावला यंदा ही ऊस देण्यासाठी शेतकर्‍यांची तयारी आहे. दोन्ही सहकारी साखर आणि आसपासच्या कारखान्यांच्या तुलनेत सर्वाधिक गाळप (ओंकार ग्रुप) गौरी शुगर करेल असा अंदाज आहे. पाच दिवसांपासून गौरी शुगरचे गाळप हंगाम सुरू झाला आहे. यामुळे ऊस वाहनांची वर्दळ वाढली आहे. दरम्यान, नागवडे कारखाना बॉयलर पेटला आहे. मात्र, असे असताना कुकडी सहकारी कारखान्याला अजून आयुक्त कार्यलयाकडून परवानगी मिळालेली नाही. यामुळे कुकडीला सुरू होण्यास वेळ लागणार असल्याचे चित्र आहे. मात्र, गाळपाला होणार उशीर हा शेतकर्‍यांसाठी अडचणीचा ठरणार आहे. अनेक ठिकाणी कालावधी पूर्ण केलेल्या उसाला तुरे फुटण्याची वेळ आली आहे.

कारखानदार विधानसभेच्या रिंगणात
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात नागवडे, जगताप याच्यांकडे सहकारी कारखानदारीचे सूत्र आहेत. तर पाचपुते दोन्ही खाजगी कारखान्यांपासून वेगळे झाले आहेत. दरम्यान, साईकृपा कारखाना ही सुरू करण्यासाठी ओंकार शुगरचे सातवे कारखाना युनिटने अधिकारी, कर्मचारी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली असल्याने तालुक्यातील चारही कारखाने पुन्हा जोमाने सुरु होण्याची शक्यता असून ते झाल्यास शेतकर्‍यांचा फायदा होणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या