ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर रखडलेल्या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. अनेक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर झालेल्या या निवडणुकीत काटे की टक्कर अशी निवडणूक होईल, प्रचाराच्या रणधुमाळी नगर शहर पेटून उठेल, विकास कामांचे मुद्दे गाजतील अशी अपेक्षा मतदारांसह शहरवासीयांची होती. प्रत्यक्षात असे काहीच घडतांना दिसले नाही. यामुळे नगर मनपा निवडणूक मु्द्यांवर लढली गेलीच नाही, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
दरम्यान, राज्यात सत्तेत असणार्या महायुतीमधील भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादी गटाविरोधात एकनाथ शिंदे गटाने दंड थोपटल्याने या निवडणुकीत खर्याअर्थाने महायुतीत राजकीय लढाई दिसून आली. तर विरोधी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादीमधील शरद पवार गट आणि उध्दव ठाकरे शिवसेना गटाचा फारसा प्रभाव या निवडणुकीत दिसला नाही. मनपा निवडणुकीत एमआयएमसह अन्य लहान पक्ष उतरले. त्यांनी काही भागात निवडणुकीतील रंगत वाढवली. मात्र, त्याचा निकालावर कायम परिणाम होणार यासाठी मोजणीची वाट पाहवी लागणार आहे.
गेल्या अनेक वर्षापासून अहिल्यानगर शहराचा मध्यवर्ती व त्या जवळचा भाग हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. या भागात शिवसेनेला सोबत घेऊनच भाजपला यापूर्वी काहीचे यश मिळाले आहे. या ठिकाणी शिवसेना सोडली तर अन्य पक्षांना फारसे स्थान मिळाले नाही. मात्र, आता भाजपने या मध्यवर्ती शहरातील प्रभागामध्ये नवखे व मातब्बर उमेदवार दिले आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 9, 10, 11, 12 व 15 या पाच प्रभागांमध्ये अटीतटींच्या लढती होत असून याकडे मतदारांचे लक्ष वेधले गेले आहे. यंदाच्या महापालिका निवडणुकीत भाजप वरचढ ठरणार की शिंदे गट गड राखणार हे बघणे औचित्याचे ठरेल. या ठिकाणी भाजप व शिवसेना शिंदे गट यांच्यातच सरळ लढत होत आहे. अर्थात भाजपच्या जोडणीला यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गट आहे.
काही प्रभागात भाजपचे तीन तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एक तसेच काही प्रभागात राष्ट्रवादी व भाजप प्रत्येकी दोन असे उमेदवार आहे. त्यामुळे युती म्हणून भाजप व राष्ट्रवादी शिवसेना शिंदे गटाबरोबर लढत येत आहे. या पाचही प्रभागामध्ये शिवसेना (एकत्रित) असतांना वर्चस्व राहिले आहे. या प्रभागामुळे शिवसेनेचे संख्याबळ नेहमीच अन्य पक्षाच्या तुलनेेत सर्वाधिक राहिली आहे. आताही पाच प्रभागात शिवसेना शिंदे गट आपले गड राखणार की भाजप वरचढ ठरणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. उपनगरात शिवसेनेपेक्षाही भाजप व राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे.
पण शहरातच्या जोरावर शिवसेना पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. त्यामुळे आताही शिवसेना शिंदे गटाने या पाच प्रभागांवर लक्ष केंद्रीत केले आहे. शहरात 16 जागांवर दोन उमेदवारांत थेट लढती होत आहेत, तर तिहेरी लढती 26 जागांवर आहेत, 18 जागांवर चौरंगी तर 5 जागांवर पंचरंगी लढती होत आहेत, केडगाव उपनगरातील एका जागेवर तब्बल 6 पक्षांचे उमेदवार एकामेकांविरूध्द उभे ठाकले आहेत.
माजी महापौर, उपमहापौरसह 60 नगरसेवक रिंगणात
यंदाच्या निवडणुकीत दीप चव्हाण, सुरेखा कदम व बाबासाहेब वाकळे या 3 माजी महापौरांसह गणेश भोसले, गीतांजली काळे व श्रीपाद छिंदम असे 3 माजी उपमहापौर व 60 नगरसेवक पुन्हा उतरले आहेत. 13 पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सर्वाधिक जागा शिवसेना (शिंदे गट) 39, त्याखालोखाल अजित पवार गट 32, भाजप 29, शरद पवार गट 29, ठाकरे गट 21, काँग्रेस 11 मनसे 7, एमआयएम 6, बसप 5, समाजवादी पक्ष 5, वंचित बहुजन आघाडी 2, एकलव्य आदिवासी बहुजन पक्ष 5, आम आदमी पक्ष 6 तर अपक्ष 81 जागांवर आहेत. एकूण 68 जागांपैकी 5 जागा बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. उर्वरित 63 जागांवर 283 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
भाजपचे 4 तर अजित पवार गटाचे 2 बंडखोर
भाजपमधील अनेक जुन्या पदाधिकार्यांची उमेदवारी कापली गेली. त्यामुळे नाराज पदाधिकार्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली होती. त्यातील काहींनी माघार घेतली. मात्र भाजपच्या चौघांनी बंडखोरी करत शिवसेनेकडून किंवा अपक्ष म्हणून उमेदवारी स्वीकारली आहे.
छोटे पक्ष निवडणूक रिंगणात
सावेडी उपनगरातील अनेक जागांवर अजित पवार गट व शरद पवार गट एकमेकांविरुद्ध आहेत. त्यांच्यात थेट लढती होत आहेत. मुस्लिम बहुल मुकुंदनगरमध्ये भाजप, अजित पवार गट किंवा शिवसेना (शिंदे गट) यांनी उमेदवार दिलेले नाहीत. तेथे काँग्रेस, एमआयएम, बसप, समाजवादी पक्ष व एकलव्य आदिवासी पक्ष यांच्यामध्ये लढती होत आहेत.
अपूर्ण प्रकल्पावर सर्वपक्षीय मौन
निवडणुकीच्या आखाड्यात सर्वच राजकीय पक्षांकडून भरभरून आश्वासने दिली जात आहेत. मात्र कोट्यवधी रुपये खर्चून अर्धवट आणि अपूर्णावस्थेत राहिलेल्या प्रकल्पांचा डोंगर आलटून पालटून सत्ता उपभोगणार्यांना हटवता आलेला नाही. त्या त्या काळातील सत्ताधारी प्रकल्प पूर्ण करण्यात सपशेल अपयशी ठरले. नगरकरांच्या खिशातून खर्च झालेले कोट्यवधी रुपये किंमतीचे प्रकल्प कधी पूर्ण होणार व मार्गी लागणार या प्रश्नावर सर्वपक्षीय मौन आहे.
केडगावमध्ये कोतकरांची छुपी रसद
केडगाव उपनगरमध्ये बाजार समितीचे माजी सभापती भानुदास कोतकर यांचे समर्थक अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर कोतकर यांनी आता त्यांच्या समर्थक अपक्ष उमेदवारांचा जाहीर प्रचार थांबवला असला तरी छुपी रसद मात्र सुरूच ठेवली आहे.





