पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
एका खासगी कंपनीच्या सबस्टेशनमध्ये खांबावर चढलेल्या बाळेवाडीच्या राहुल निवृत्ती पालवे या तरुणास विजेचा जोरदार धक्का लागून जमिनीवर कोसळल्याने जागीच मृत्यू झाला. राहुल हा अकुशल कामगार असताना त्याला सबस्टेशनमधील खांबावर का चढविले? असा सवाल करीत ग्रामस्थांनी सबस्टेशनजवळच ठिय्या दिला. दरम्यान, संतापलेल्या ग्रामस्थांनी सबस्टेशनला टाळे ठोकले. त्यामुळे घाबरलेल्या कंपनीच्या अधिकारी-कर्मचार्यांनी तेथून पळ काढला.
या खासगी कंपनीचे नगर तालुक्यातील बाळेवाडी शिवारात डोंगरात सबस्टेशन आहे. दोन महिन्यांपूर्वीच येथे अकुशल कामगार म्हणून राहुल निवृत्ती पालवे (वय 25 वर्षे) रा.बाळेवाडी, ता.नगर या तरुणास या सबस्टेशनवर कामास घेतले होते. शुक्रवारी (दि.18) दुपारी तीन वाजता राहुल यास अधिकार्याने पोलवर चढण्यास सांगितले.
विजेचा पुरवठा चालू असताना कोणतीही काळजी न घेतल्याने राहुल यास विजेचा तिव्र धक्का बसताच तो उंच टॉवरवरून जमिनीवर कोसळताच त्याचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री उशीरा त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शनिवारी सकाळीच बाळेवाडी ग्रामस्थांनी कंपनीच्या सबस्टेशनवर ठिय्या देऊन निषेध केला. यावेळी सबस्टेशनवरील कर्मचार्यांनी सबस्टेशन सोडून पळ काढला. त्या सबस्टेशनवर एकच सुरक्षारक्षक हजर असल्याचे समजले.