अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
विजेचा शॉक (Electric Shock) बसून 9 वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू (Child Death) झाल्याची घटना एमआयडीसी परिसरात असलेल्या आठरे पाटील बालगृहात सोमवारी सकाळी घडली. साईराज गणेश भांबरे (रा. आठरे पाटील बालगृह, एमआयडीसी, मूळ रा. खातगाव ता. शेवगाव) असे या मयत बालकाचे नाव आहे.
मयत साईराज याच्या वडिलाचे निधन झालेले असल्याने त्याला त्याचे मामा शिवराज भीमराज देडगे व इतर नातेवाईकांनी एमआयडीसी (MIDC) परिसरात असलेल्या आठरे पाटील बालगृहात (Athare Patil Balgruh) ठेवलेले होते. त्याने दुसरीची परीक्षा दिली होती व तो इयत्ता तिसरीमध्ये गेलेला होता. सोमवारी सकाळी तो बालगृहात असताना त्याला विजेचा शॉक बसला. ही माहिती तेथील कर्मचार्यांनी त्याचे मामा शिवराज देडगे यांना कळविली. त्यांनी तातडीने बालगृहात धाव घेत साईराज याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात सकाळी 10.20 च्या सुमारास दाखल केले.
मात्र तेथील डॉक्टरांनी त्यास उपचारापूर्वीच मयत घोषित केले. दुपारी त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेनंतर मयत साईराजचे नातेवाईक संतप्त झाले. बालगृहाच्या व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप करत व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मयत मुलाच्या नातेवाईकांनी केली आहे. दरम्यान याप्रकरणी गुन्हा दाखल (Filed a Case) केला जाणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी सांगितले.