आश्वी |वार्ताहर| Ashwi
संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथील पंकज अरुण कांबळे हा बावीसवर्षीय तरुण शेणखत भरण्याच्या कामासाठी गेला असता वीजेचा जबर धक्का लागून 28 नोव्हेंबर 2024 रोजी मृत्यूमुखी पडला होता. त्यामुळे मयत पंकजच्या कुटुंबियांनी दुःखातून सावरल्यानतंर तब्बल 25 दिवसांनी आश्वी पोलीस ठाण्यात गावचे ग्रामसेवक, सरपंच व अन्य एका व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचे म्हणत गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत शरद पुंजा कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की 28 नोव्हेंबर, 2024 रोजी पुतण्या पंकज अरुण कांबळे हा गावातील आकाश गिते व भाऊराव बर्डे यांच्यासमवेत शेणखत भरण्याच्या कामासाठी संजय शिखरे यांच्या वस्तीवर गेला होता.
सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास आकाश गिते याने भाऊ अरुणला फोन करुन सांगितले की शेणखत भरण्याचे काम सुरू असताना ग्रामपंचायत दलित वस्ती अंतर्गत असलेल्या पथदिव्याच्या खांबाला बांधलेल्या सर्विस वायरला फावडे लागल्याने वीजेचा जबर धक्का लागल्यामुळे पंकज बेशुद्ध पडला आहे. त्यामुळे मी व भाऊ अरुण तत्काळ घटनास्थळी गेलो असता पथदिव्याच्या दोन खांबामधील जोडलेली केबल ही ज्या तारेने बांधलेली होती ती केबल जमिनीपासून अवघ्या पाच फूट अंतरावर लोंबकळत होती व त्या खालीच शेणखताचा ढिगारा होता. याप्रसंगी पुतण्या पंकजला उपस्थितांच्या मदतीने उपचारासाठी आश्वी येथील खासगी रुग्णालयात नेले असता त्याला लोणी येथील रुग्णालयात हलविण्याची सूचना डॉक्टरांनी केली.
त्यामुळे आम्ही त्याला लोणी येथे घेऊन गेलो. पण, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर 29 नोव्हेंबर, 2024 रोजी दुपारी पंकजवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान पथदिव्यांच्या कामात निष्काळजीपणा दाखवल्यामुळे पंकजचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत ग्रामसेवक संग्राम चांडे (रा. चांडेवाडी, ता. राहाता), सरपंच अर्चना भुसाळ व संजय शिखरे (दोघे रा. उंबरी बाळापूर, ता. संगमनेर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.