राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
राहुरी तालुक्यातील लाख येथे एका 77 वर्षीय शेतकर्याचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना काल दि. 21 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास लाख येथे घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली. भास्कर भाऊसाहेब खाडे (वय 77) हे राहुरी तालुक्यातील लाख येथे राहत असून ते लाख विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन व तंटामुक्ती अध्यक्ष होते. भास्कर खाडे हे काल दि. 21 रोजी दुपारी त्यांच्या लाख शिवारातील शेतात पिकाला पाणी भरण्यासाठी गेले होते. दरम्यान श्री. खाडे यांना विजेचा जोरदार धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
बराच वेळ झाला तरी ते घरी परतले नाही. त्यामुळे त्यांचा नातू अमोल खाडे हा त्यांना पाहण्यासाठी गेला असता भास्कर खाडे हे बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने रुग्णवाहिकेतून त्यांना राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केले. पो.नि. संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राहुल यादव व सुरज गायकवाड यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. या घटनेबाबत सायंकाळी उशीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. भास्कर भाऊसाहेब खाडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, नातू असा मोठा परिवार आहे.