Monday, May 27, 2024
Homeनगरवीज ग्राहकांची लूट करणार्‍या अधिकार्‍याला वरिष्ठ अधिकार्‍यांनी सुनावले

वीज ग्राहकांची लूट करणार्‍या अधिकार्‍याला वरिष्ठ अधिकार्‍यांनी सुनावले

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

वीज वितरण कंपनीमध्ये सुरू असलेल्या सावळ्या गोंधळाची वरिष्ठ अधिकार्‍यांनी त्वरित दखल घेतली असून मीटरचे कोटेशन देण्यासाठी ग्राहकांची लूट करणार्‍या एका अधिकार्‍याला वरिष्ठ अधिकार्‍यांनी काल चांगले सुनावले. वीज ग्राहकांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्वरित ग्राहक सेवा सप्ताह आयोजित करून वीज ग्राहकांच्या सर्व अडचणी त्वरीत सोडविणार असल्याची ग्वाही वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी दिली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीच्या संगमनेर येथील कार्यालयातील एका अधिकार्‍यांकडून वीज ग्राहकांची मोठी आर्थिक लूट होत आहे. मीटरचे कोटेशन घेण्यासाठी ग्राहकांकडे हा अधिकारी पैशाची मागणी करत होता. या अधिकार्‍याला लाच देणार्‍या वीज ग्राहकांना अवघे दीड हजार रुपयांचे कोटेशन दिले जाते. जे ग्राहक देणार नाही अशा वीज ग्राहकांना पाच हजार रुपयांचे कोटेशन दिले जाते. कोटेशन देण्यासाठी वीज अधिकार्‍यांकडून मोठ्या प्रमाणावर दूजाभाव केला जात आहे. याबाबत काल दैनिक सार्वमत मध्ये वृत्त प्रकाशित झाले. या वृत्ताची वीज कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेतली आहे. कोटेशन साठी ग्राहकांना त्रास देणार्‍या अधिकार्‍याला या अधिकार्‍याने चांगलेच सुनावले.

संगमनेर तालुक्यामध्ये वीज ग्राहकांच्या अनेक तक्रारी आहेत. अनेकदा तक्रारी करूनही ग्राहकांच्या या तक्रारीचे निवारण केले जात नाही यामुळे वीज ग्राहकांमध्ये मोठा संताप आहे.

दैनिक सार्वमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच वरिष्ठ अधिकार्‍यांनी या वृत्ताची गंभीर दाखल घेतली आहे. सध्या सर्वत्र वीज वितरण कंपनीचा ग्राहक सेवा सप्ताह सुरू आहे.

संगमनेर येथे त्वरीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून ग्राहकांच्या अडचणी या सप्ताह मधून सोडविणार असल्याची माहिती वीज वितरण कंपनीचे उपअभियंंता श्री. खैरनार यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्यावतीने ग्राहक सेवा सप्ताहाचे दि. 2 ते 8 ऑगस्ट दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहास प्रारंभ झाला आहे. या सप्ताहात नवीन विद्युत जोडणी, प्रलंबित विद्युत जोडणी, कायमस्वरुपी, तात्पुरता खंडीत केलेला विद्युत पुरवठा पुर्ववत करणे, विद्युत देयकाच्या नाव, पत्ता, विद्युतभार, वर्गवारी, यात बदल करणे, वीज बिल दुरुस्ती करणे आदी तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या