अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राज्यात एक एप्रिलपासून वीज महागली असून प्रतियुनिट 60 पैसे अधिक द्यावे लागणार आहेत. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाच्या खिशाला झळ बसणार असून 25 ते 100 रुपयांचे बिल जादा येणार आहे.
महावितरणने परिपत्रक काढून घरगुती ग्राहकांची वीज प्रति युनिट 60 पैशांनी महाग केली आहे. यासाठी इंधन समायोजन शुल्कचा (एफएसी) आधार घेण्यात आला आहे. मागील वर्षी उन्हाळा आणि त्यानंतर मान्सूनमध्ये वीजपुरवठा कमी झाल्याने बाहेरून महाग वीज खरेदी करण्यात आली होती. आता त्याच्या भरपाईसाठी ग्राहकांकडून इंधन समायोजन शुल्क आकारले जात आहे.
1 एप्रिलपासून राज्यात स्वस्त वीज उपलब्ध होणार होती. त्याच दिवशी महावितरणने परिपत्रक काढून मार्चमध्ये वापराच्या प्रत्येक युनिटवर एफएसी जमा करण्याचे आदेश दिले. यासाठी, कंपनीने 30 मार्च 2020 च्या आयोगाच्याच आदेशाचा हवाला दिला आहे.
व्यावसायिक ग्राहकांना 40 ते 60 पैसे
एफएसी मार्चच्या वापरावरच लागू केला जाईल. मात्र, महावितरणचे वीज खरेदीचे महागडे दर पाहता ही वसुली येत्या काही महिन्यांतही सुरूच राहणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्याचा परिणाम घरगुती ग्राहकांसह प्रत्येक वर्गावर होणार आहे. वर्गवारीनुसार, व्यावसायिक ग्राहकांना 40 ते 60 पैसे, कृषी 15 ते 30 पैसे, पथदिवे 30 ते 35 पैसे, पाणीपुरवठा योजना 30 ते 35 पैसे, ईव्ही चार्जिंग स्टेशनला 40 पैसे आणि उद्योगांना 35 ते 40 पैसे अधिक द्यावे लागतील.