कर्जत |प्रतिनिधी| Karjat
नदीपात्रामध्ये असलेल्या समर्थ बंधार्यात पाणी पिण्यासाठी गेलेल्या चार म्हशींचा पाण्यात विजेचा प्रवाह उतरल्याने मृत्यू होण्याची घटना घडली आहे. यावेळी शेतकर्याने प्रसंगावधान राखल्यामुळे इतर 15 ते 20 म्हशींचे प्राण वाचले असून स्वतः शेतकर्याचा देखील जीव वाचला आहे.
याबाबत घडलेली घटना अशी की, शेतकरी सोपान बरबडे नेहमीप्रमाणे आपल्या म्हशी चारण्यासाठी या परिसरामध्ये घेऊन आले होते. यानंतर म्हशी तहान लागल्याने कर्जत शहरातील लेंडी नदीवर समर्थ बंधारा आहे. त्या बंधार्यामध्ये पाणी पिण्यासाठी आल्या. यावेळी चार म्हशी पाण्यामध्ये गेल्या. त्यामध्ये विजेचा प्रवाह आलेला होता आणि अवघ्या काही सेकंदात या चारही म्हशी विजेचा धक्का बसल्यामुळे पाण्यात कोसळल्या. पाणी पाजण्यासाठी आलेल्या शेतकर्याच्या हे लक्षात आले. त्यांनी तात्काळ प्रसंगावधान राखत पाठीमागून पाण्याजवळ धावत येत इतर सर्व म्हशींना पाण्यामध्ये प्रवेश करू न देता पाठीमागे ढकलले. यामुळे इतर 15 ते 20 म्हशींचे प्राण वाचले.
यावेळी पाण्यापासून स्वतःला लांब ठेवल्यामुळे या शेतकर्याचा देखील जीव वाचला. त्यानंतर तात्काळ महावितरण कंपनीच्या कर्जत कार्यालयाला फोन करून माहिती कळवली. यानंतर त्यांनी तात्काळ या परिसरातील विजेचा प्रवाह बंद केला.दरम्यान यानंतर महावितरणचे अधिकारी घटनास्थळी घेऊन त्यांनी पंचनामा केला आहे. या परिसरातून जाणारी वीज वाहक तार तुटून ती पाण्यामध्ये पडली होती व त्याचा प्रवाह पाण्यामध्ये उतरला असल्याचे दिसून आले. पशुवैद्यकीय अधिकार्यांनी मृत म्हशींचे शवविच्छेदन केले आहे. शेतकरी बरबडे यांनी कर्ज काढून म्हशी खरेदी केल्या असून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे. या घटनेनंतर परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत असून पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.