अकोले |प्रतिनिधी| Akole
तालुक्याच्या एका गावातील अकरा वर्षीय मुलीने बाळाला जन्म दिल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अकोले पोलिसांत संबंधित बालिकेवर अत्याचार करणार्या संदीप मेंगाळ या नराधमावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत.
वैद्यकीय अधिकारी डॉ. संकेत गडाख यांनी पोलिसांत तक्रार दिली असून त्यात म्हटले, की 9 ते 10 महिन्यापूर्वी सुगाव बुद्रुक शिवारातून कोणी तरी संदीप मेंगाळ नावाच्या इसमाने सदर पीडित मुलीला पळवून नेवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. यामुळे ती गरोदर राहून 26 जानेवारी, 2026 रोजी रात्री 9.54 मिनिटांनी एका सरकारी रुग्णालयात तिने बाळाला जन्म दिला. यावरून आरोपी संदीप मेंगाळ याच्याविरुद्ध अकोले पोलिसांनी गुन्हा नोंद क्रमांक 39/2026 बीएनएस कलम 65 (2),137 (2), पोक्सो 4, 6 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती हे करत आहेत.
दरम्यान, तालुक्यात अल्पवयीन मुली गरोदर राहणे, प्रसूती होणे या घटना वाढत आहेत. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 2025 या तीन महिन्यांत 55 अल्पवयीन माता या गरोदर होत्या. तर काहींच्या प्रसूती देखील झाल्या होत्या. याशिवाय मुली पळून जाऊन लग्न करण्याच्या देखील घटना वाढत आहेत. मुलींवरील अत्याचाराच्या देखील घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. बालविवाहाचेही प्रमाण वाढत चालले असून या सार्या घटना चिंता वाढविणार्या आहेत. परंतु, प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे.




