Saturday, July 27, 2024
Homeनाशिकसारे जहाँ से अच्छा...

सारे जहाँ से अच्छा…

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

देशसेवा करण्यासाठी सीमेवर (Border) जाण्याचे भाग्य ज्यांना मिळाले नाही त्यांनी देशातच राहून विविध क्षेत्रात आपली कामगिरी बजावत देशाचे नाव मोठे केले. आपल्या राष्ट्रध्वजाचा (National flag) मान ठेवण्यापासून देशाच्या बाहेर राहणार्‍या भारतीयाला (Indians) देशाचा अभिमान आहे. हा अभिमान युवकांनी आपल्या शब्दात मांडला….

- Advertisement -

चीनची खुमखुमी मिटवूनच द्यावी

आपल्या देशाकडे कोणी वाकड्या नजरेने जरी पाहीले तरी अंगावर काटा येऊन दुश्मनाचा खात्मा करण्याची भावना तीव्र होते. 2020 च्या जून महिन्याच्या 15-16 तारखेला चिनी सैनिकांनी आपल्या सैनिकांवर हल्ला करुन 20 जवान शहीद केल्याची बातमी कानावर पडताच भावना तीव्र झाल्या.

एकदाची चीनची खुमखुमी मिटवायलाच हवी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी थेट हल्लाच चढवावा, असे मनात येत होते. आपल्या देशाच्या सीमेत येण्याचे धाडस करणार्‍या चिनी सैनिकांना बोलण्यास गेलेल्या भारतीय जवानांवर दगडांनी मारा केला होता. त्याला उत्तर देतांना आपण त्यांच्या चाळीस सैनिकांचा खात्मा केला होता.

भारत देश आता पूर्वीसारखा राहिला नसून त्याची झलक पाकिस्तानात झालेल्या ‘ऐअर स्ट्राईक’ नंतर जगाने पाहिली. चीनलादेखील यापुर्वी भारतीय जवानांनी चांगला धडा शिकवला आहे. त्यावेळी ‘ हिंदी चिनी भाई-भाई’ म्हणून प्रसार झालेल्या चीनच्या सैनिकांना पुन्हा त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यात यावे, अशी भावना निर्माण झाली आहे.

– फारुख पठाण

तिरंग्याचा मान राखा!

देशातील नागरिक स्वातंत्र्याच्या भावनेला वेगवेगळ्या पद्धतीने साजरे करतात. स्वातंत्र्य दिनाच्या साधारण एक ते दीड आठवड्यापूर्वी बाजारपेठांमध्ये ‘तिरंगा’ (Tiranga) विक्रीसाठी उपलब्ध होतो. अनेक नागरिक स्वातंत्र्य दिन साजरा करण्याच्या उद्देशाने हा तिरंगा विकत घेतात. दरवर्षी देशात स्वातंत्र्य दिन मोठ्या दिमाखाने साजरा केला जातो.

सकाळच्या सुमारास स्वातंत्र्य दिन साजरा करून झाला की, दुपारपासूनच हाच तिरंगा नागरिक अनावधानाने रस्त्यांवर फेकून देतात. दुसर्‍या दिवशी हाच तिरंगा कचरापेटीत दिसून येतो. म्हणजे आपण एक प्रकारे आपल्या राष्ट्रध्वजाचा अपमान करीत आहोत.

मी लहान असताना स्वातंत्र्य दिनाच्या दुसर्‍या दिवशी शाळेत जाताना रस्त्यावर फेकलेला भारताचा ध्वज मी गोळा करून घरी घेऊन येत असे. रस्त्यावर फेकलेले झेंडे पाहून मन भरून यायचे. लोक रस्त्यावर तिरंगा का फेकतात? अशी चूक आपण नकळतपणे तरी का करतो? आपण आपल्या देशाचा, राष्ट्रध्वजाचा मान का राखत नाही? असे अनेक प्रश्न माझ्या मनात यायचे.

देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेकांना आपल्या प्राणाचे बलिदान द्यावे लागले तर काहींना आपले घरदार सोडावे लागले आहे. एवढेच नाही, तर आज सीमेवर आपले सैनिक डोळ्यात तेल घालून अहोरात्र जागून देशाचे शत्रूपासून संरक्षण करीत आहे. म्हणूनच तर आपण आपल्या घरांमध्ये सुखाने जगत आहोत.

मात्र आपल्या देशाचे मानचिन्ह ‘तिरंगा’ झेंड्याची अवहेलना गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. यासाठी आपण स्वतःच पुढाकार घेऊन आपल्या तिरंग्याची अवहेलना थांबविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कारण राष्ट्रध्वजाचा मान राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.

– अनिरुद्ध जोशी

स्वप्नपूर्तीचे आनंदाश्रू

नाशिक जिल्ह्याच्या (Nashik District) सावरपाडा (Savarpada) येथील एक गरीब कुटुंबातील कविता राऊत. विजेंद्र सिंग (Vijendra Singh) यांनी तिला धमकावून आपल्या घरी आणले. तिच्यावर खूप मेहनत घेतली सातत्याने तिच्याकडून व्यायाम व सराव करून घेतला.

कविता राऊत (Kavita Raut) हिने 2010 साली आशियाई स्पर्धांमध्ये कांस्य पदक पटकावले होते. आशियाई स्पर्धा जिंकणे हे त्यांचे स्वप्न कविताने पूर्ण केल्याचे वृत्त धडकताच देशाभिमान सोबतच स्वप्नपूर्तीचे आनंदाश्रू त्यांच्या डोळ्यातून पटकन झरु लागले होते.

ज्या कविताच्या यशाने देशाचा नावलौकिक वाढवला याचा अभिमान त्यांच्या आनंदातून दिसून येत होता. परिश्रमाच्या फलश्रुतीची यशस्वी सांगता झाल्याने ते आनंदित होते. सोबत देशासाठी काही योगदान लिहिता आल्याबद्दल देशाभिमानाने अश्रूधारांची बरसात ही सुरूच होती.

– रवींद्र केडीया

तो राजपथ..तो तिरंगा आणि माझी सलामी

नाशिकमधील हिरे महाविद्यालयात पदवीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला त्याच वर्षी तिथे मुलींसाठी एनसीसी सुरु झाले. त्या बॅचची निधी देवरे ही पहिलीच सिनियर विंग कमांडर. तिथून खरी सुरुवात झाली तिच्या रिपब्लिक डे च्या परेडची. महाविद्यालयापासून सुरु होऊन दिल्लीच्या राजपथपर्यंत एकूण 10 शिबिरे.

ही दहाही शिबिरे एका पेक्षा एक सरस. प्रत्येक ठिकाणी आव्हाने जास्त. वास्तविक त्यांची काठीण्य पातळी एवढी का आहे हे राजपथावर संचलन करताना समजते, असे ती सांगते. कित्येक किलोमीटर संचलन केल्यावर इंडिया गेट दृष्टीपथात आले आणि आमचा थकवादेखील निघून गेला. पुढे अनुभवत होतो ते अतिशय भव्य दिव्य.

रस्त्याच्या दुतर्फा भारतीय नागरिक आणि त्याच्या मध्यभागी असलेल्या राजपथ वरून आम्ही संचलन करून त्यांना अभिवादन करतोय. मध्यावधीजवळ आल्यावर तो भारत मातेचा तिरंगा दिसला. याच तिरंग्यासाठी कित्येकांनी प्राणांची आहुती दिली. त्याचा मान सन्मान म्हणजे प्रत्येक भारतीयाचा सन्मान. 9 वा 50 मिनिटांची वेळ आणि आवाज कॅडेट राष्ट्रीय ध्वज को सलामी देंगे, सलामी दो.. सलामी देताना मला दिसत होता तो फक्त तिरंगा.

– वैभव कातकाडे

खूप अभिमान

देशप्रेम म्हटलं किती हृदयापासून असत. त्याची प्रचिती भारतात असताना तर आलीच मात्र, भारताबाहेर जास्त प्रमाणावर आली. त्या ठिकाणी आपल्याला भेटणारे लोक जर भारतीय असतील तर जास्तच जिव्हाळ्याचे वाटते. यासोबतच 15 ऑगस्ट म्हणजे आपला स्वतंत्र दिन. मी बहारीन या देशात असताना 14 ऑगस्ट हा पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत होतांना बघितला.

तर दुसर्‍याच दिवशी सकाळी म्हणजे 15 ऑगस्ट रोजी भारताचा तिरंगा ध्वज फडकविण्याकरिता व त्याला मानवंदना देण्याकरता महाराष्ट्र मंडळाचे सभासद मोठ्या संख्येने भारतीय अँबेसीमध्ये येत असत, एक वेगळाच असा गर्व मी भारतीय असल्याचा त्यावेळी मनाला वाटायचा. यातच आपण भारताबाहेर राहून देखील आपला स्वतंत्र दिन उत्साहात साजरा करतो याचा खूप मोठा अभिमान वाटायचा.

– निशिकांत पाटील

सेवा हीच देशभक्ती…!

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्‍या एखाद्या विद्यार्थ्याला तिरंगा फडकत असतांना दिसला तरी अंगावर रोमांच उभे राहतात. त्याला नव्याने पाठबळ मिळते. भारतीय सीमेवरील जवान बघितल्यावर माणूस त्याच्याकडे एक वेगळ्याच अभिमानाने पाहतो. हेच ते महान सैनिक जे सीमेवर वेळप्रसंगी हसत हसत देशासाठी प्राणाची आहुती देतात.

हा झाला सर्वसामान्य माणसाचा दृष्टिकोन. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांची गोष्ट थोडी वेगळी असते. कधीतरी का होईना तो काही कामानिमित्त कुठल्याही सरकारी कार्यालयात जातो. त्या ठिकाणी गेल्यावर मनात एक वेगळीच चलबिचल सुरू होते. देशाच्या सीमेवर जाता नाही आले म्हणून काय झाले? देशांतर्गत एखादा अधिकारी होऊन देखील समाजव्यवस्थेत काम करून देश सेवा करता येईल ही भावना त्याच्या मनात असते.

सणावाराला गणपती, शिवजयंतीला ज्या वेळी माणसांची रस्त्यावर गर्दी होत असते त्या वेळी सर्व परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर नियोजन करत असतो त्यावेळी एक स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारा स्पर्धक त्या पोलिसांकडे अभिमानाने पाहत असतो.

त्यांच्यासारखा पोलीस अधिकारी आपणही होऊन समाजाची देशाची सेवा करू शकतो हे विेशास आणि आशावाद त्याच्या मनात असतो. देशभक्तीपर गीत जर ऐकले तर डोळ्यात नकळत पाणी येते अभिमानाने उर भरून येतो आपण भारतीय असल्याचा अभिमान वाटतो. ’संदेसे आते है…’ बॉर्डर चित्रपटातील हे गाणं ऐकले नसेल असा कोणीही भारतीय शोधूनही सापडणार नाही. त्या गाण्याचे बोल मनाला भेदून टाकतात.

– ज्ञानेश्वर जाधव

सैनिकांविषयी आदर

देशाला मिळालेल स्वातंत्र, त्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी जीवाची,विचारांची शर्थ केली. पण त्यापुढे जावून स्वातंत्र्य, देशाच्या सीमा सुरक्षा रक्षणाची जबाबदारी ज्या अभेद खांद्यांवर टिकून आहे ती म्हणजे भारताची आर्मी.

स्वातंत्रदिनी जितका उजाळा क्रांतिकारकांच्या आठवणींनी भरलेला असतो तितकाच तो सैनिकांच्या अनेक देश लढायाच्या यशस्वी विजयाचा असतो. अशाच सैनिकांबद्दल एक विशेष कृतघ्नता प्रेम आदर किंवा त्याला देशप्रेम म्हणून की काय माझा एक अनुभव आहे आणि तस करताना मी अनेकांना पहिल्याच मला आठवत, की जेव्हा कधी सैनिकांनी जवानांनी भरलेली गाडी जवळून जाते, किंवा एखादा जवान रस्त्याने दिसतो.

तेव्हा त्यांना मनापासून सॅल्यटु करावा वाटतो आणि तो केलाही जातो. ती फिलिंग तो अनुभव त्या क्षणी मन अभिमानाने भरुन आलेल असत. हे सगळ होत त्याला कारण एकच आर्मीची शिस्त, काम करण्याची पद्धत, त्यामागे असलेली अफलातून मेहनत आणि त्यांच्या प्रत्येक कृतीत दिसणारी निस्वार्थ देशसेवा.

– शुभम धांडे

- Advertisment -

ताज्या बातम्या