Thursday, September 19, 2024
Homeक्राईमनोकरदाराची दोन लाखांची ऑनलाईन फसवणूक

नोकरदाराची दोन लाखांची ऑनलाईन फसवणूक

बँकेच्या नावे आलेल्या बनावट फोनला दिला प्रतिसाद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

आयसीआयसीआय बँकेच्या नावे आलेल्या बनावट फोनला प्रतिसाद दिल्याने नोकरदार व्यक्तीच्या क्रेडीट कार्डवरून दोन लाख तीन हजार 304 रुपये ऑनलाईन कट झाल्याची घटना घडली आहे. सुदीप याकोब साळवे (वय 40 रा. कायनेटीक चौक, नगर) असे फसवणूक झालेल्या नोकरदार व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी मंगळवारी (23 जुलै) दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात आलोक सिंगला (पूर्ण नाव, पत्ता नाही) नावाच्या व्यक्तीविरूध्द फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी हे महावितरणमध्ये नाशिक येथे नोकरीला आहे. त्यांचे कुटुंब नगर शहरातील कायनेटीक चौक परिसरात राहते. ते शनिवार व रविवारी नगरमध्ये येत असतात. गेल्या शनिवारी (20 जुलै) दुपारी ते नगरमधील घरी असताना त्यांच्या मोबाईल नंबरवर एक अनोळखी व्यक्तीने फोन केला. फोन करणार्‍या व्यक्तीने फिर्यादी यांना आयसीआयसीआय बँकेमधून आलोक सिंगला बोलत असल्याचे सांगितले व तुमच्या क्रेडीट कार्डचा ‘सीपीपी’ काढून टाकायचा आहे त्यासाठी बँकेचे अ‍ॅप डाऊनलोड करा असे सांगितले. फिर्यादी यांनी त्या व्यक्तीवर विश्वास ठेऊन आयसीआयसीआय बँकेचे अ‍ॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड केले.

त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी अ‍ॅटोरीड झाला व काही वेळातच त्यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडीट कार्डवरून एक लाख एक हजार 652 रुपये कट झाल्याचा मेसेज आला. काही वेळानंतर पुन्हा एक लाख एक हजार 652 रूपये कट झाल्याचा मेसेज आला. फिर्यादी यांनी त्या व्यक्तीला के्रडीट कार्डवरून पैसे कट झाल्याचे सांगितले असता त्याने तुमचे पैसे 24 तासांत तुमच्या क्रेडीट कार्डवर पुन्हा जमा होतील असे सांगितले. दरम्यान, फिर्यादी यांना पैसे न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी सुरूवातीला ऑनलॉईन तक्रार दाखल केली व नंतर मंगळवारी कोतवाली पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे अधिक तपास करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या