अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील मजुरांच्या संख्येत विधानसभा निवडणुकीच्या काळात घट झाली होती. निवडणुका झाल्यानंतर कामांच्या संख्येत वाढ होवून मजुरांची संख्या देखील वाढली आहे. सध्या जिल्ह्यात 2 हजार 138 कामांवर 8 हजार 915 मजूर काम करत आहेत.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत काम मागणार्या लाभार्थ्यांना अकुशल रोजगार पुरविला जातो. यामध्ये 100 दिवसांपर्यंत रोजगाराची हमी केंद्र सरकारची आहे. त्यानंतरची रोजगाराची हमी राज्य सरकार देते. योजनेचे संपूर्ण कामकाज हे संगणकीकृत असून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात त्यांच्या मजुरीची रक्कम जमा केली जाते. हे सर्व कामकाज पारदर्शक पध्दतीने केले जाते. या योजनेंतर्गत सार्वजनिक, तसेच वैयक्तिक कामे देखील घेता येतात.
रोजगार हमी योजनेत 289 रुपये रोजंदारी दिली जाते. राज्य निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू केली. आचारसंहिता कालावधीत नवीन कामांचे उद्घाटन करता येत नसल्याने कामेही ठप्प होती. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम नव्हते. निवडणुकीमुळे काहींच्या हाताला कामही मिळाले. काहींना कामाची प्रतीक्षा होती. जिल्ह्यातील बहुतांश मजुरांची रोजंदारीची रक्कम त्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे. सद्यस्थितीमध्ये सुमारे 736 मजुरांची रक्कम देय बाकी आहे. रोजगार सेवकांकडून अहवाल उशिरा मिळणे, वेबसाईटवरील तांत्रिक अडचणी आदी कारणांमुळे ही देयके बाकी असल्याचे उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना) अनुपसिंह यादव यांनी सांगितले.
तालुकानिहाय सुरू असलेली कामे व कंसात मजूर संख्या
अकोले 130 (344), जामखेड 15 (120), कर्जत 204 (2623), कोपरगाव 81 (148), अहिल्यानगर 69 (441), नेवासा 150 (518), पारनेर 196 (2064), पाथर्डी 58 (377), राहाता 55 (232), राहुरी 59 (273), संगमनेर 146 (851), शेवगाव 96 (517), श्रीगोंदे 72 (340), श्रीरामपूर 17 (67).