– अलका दराडे
घराघरांतील संवादाला किती महत्त्व आहे हे वेगळे का सांगायला हवे? एक आई ते आजी या प्रवासात बदलत जाणारे संवादाचे टप्पे धुंडाळणारे सदर…
सर्वांनाच वाटते की आपल्या मुलांना चांगले वळण लागावे. मुलांनी एखादे छान काम केले की सगळेच मुलांचे मनापासून कौतुक करतात. कौतुकातूनही छानशी संवादनिर्मिती होते. आई किंवा आजी सहजपणे म्हणते, छान काम केले रे बाळा, शाब्बास बेटा. अगं आजी, मला आज सुट्टी होती ना म्हणून घर मनापासून आवरले. त्यात काय एवढे? नातवाचे पटकन उत्तरही आले. न सांगता आपल्या खोलीबरोबर सर्व घरच आवरणे किंवा व्यवस्थित कलात्मकरीत्या लावणे यामुळे घराला टापटीपपणा तर येतोच पण मुलांना आपल्या घराविषयी आपुलकी वाटते हे त्यांच्या क्रियेतून समजते.
अशा सहजपणे घडणार्या घटनाही घरातील सर्वच नातेसंबंधांमधे आपुलकी व गोडवा निर्माण करतात. प्रतिक्षिप्त क्रिया जशी नकळत सहजपणे घडते तशीच ही शाबासकीची थापही सहजपणे मिळते व त्यामुळे मुलांना काम करण्यास स्फूर्ती मिळते. आपण केलेल्या चांगल्या कामांची घरातील सर्वजण दखल घेतात हे लक्षात आल्यावर मुलांना आपल्याकडून असलेली पालकांची अपेक्षा समजते व ते स्वतःहून सर्व कामे करू लागतात. त्यांच्या या गुणांमुळे सर्वांना मदत तर होतेच पण कामाचा ताणही वाटला जातो. मुख्य म्हणजे यामुळे कामांची लागलेली सवय आयुष्यभर पुरते व आयुष्यात कोणतीही गोष्ट अडून राहत नाही. एकमेकांना केलेल्या मदतीमुळे वेळ तर वाचतोच पण वाचलेल्या वेळेचा परत दुसर्या कामासाठी सदुपयोगही करता येतो. घराबाहेर वागताना आपला अनेकांशी संबंध येतो जसे शेजारीपाजारी, नातेवाईक वा मित्रमंडळ. अशा ठिकाणी कोणाला आपली गरज वाटली तर स्वयंस्फूर्तीने मदत करावी. यातून मानसिक समाधान मिळते व आपली सकारात्मकतेने प्रगतीही होते. तुकाराम महाराज म्हणतात, ‘एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ’.
वेळप्रसंगी सर्वांनाच केलेल्या मदतीतूनच शाबासकी तर मिळतेच परंतु भविष्यातील वाटचालीसाठी प्रोत्साहनही मिळते.
(क्रमश:)