Thursday, May 30, 2024
Homeनगरअतिक्रमण अन् सरकारी जागेची सर्रास विक्री ?

अतिक्रमण अन् सरकारी जागेची सर्रास विक्री ?

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर ते बेलापूर रस्ता चौपदरीकरणाचे काम सुरु असले तरी या कामात अडथळा ठरणारे या रस्त्याच्या कडेचे अतिक्रमण हटविण्यात शासकीय यंत्रणेला अपयश आले आहे. हे अतिक्रमणधारक मुख्य रस्त्यापासून थोडे अंतरावरच मागे सरकून अरिक्रमण काढल्याचे भासवत आहे. अनेक व्यावसायिकांनी या सरकारी जागा चक्क खरेदी केल्या आहेत. सरकारी जागेची खरेदी- विक्री होत असताना या जागेची मालकी असलेले सार्वजनिक बांधकाम विभाग व पाटबंधारे विभागाचे अधिकारी मात्र मुग गिळून बसले आहेत. त्यामुळे या अतिक्रमणधारकांना कुणाचे अभय आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

- Advertisement -

आ. लहु कानडे यांच्या पुढाकारातून श्रीरामपूर ते बेलापूर रस्ता चौपदरीकरणासाठी निधीस मंजुरी मिळून चौपदरीकरण व रूंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून ते पूर्णत्वाकडे जात आहे. मात्र या रस्त्यावर ठिकठिकाणी अतिक्रमण झालेले आहे. रस्त्यापासून काही अंतरावरच नागरिकांनी लोखंडी पत्र्याचे गाळे तयार करुन अतिक्रमण केलेले आहे. वास्तविक पाहता ज्यावेळेस श्रीरामपूर-बेलापूर रस्ता रूंदीकरण व चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले त्यावेळी संबंधित अतिक्रमण धारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र त्यावेळेस रस्त्यापासून मागे सरकून अतिक्रमण कायम ठेवल्याचे दिसते.

आपली दुकाने मागे घेताना त्यांनी पाटबंधारे विभागच्या चारीवर अतिक्रमण केल्याने ही चारी नामशेष झाली आहे. तर अनेकांनी ही सरकारी जागा चक्क पैसे देवून मिळविली आहे. तमुळे ते त्या जागेवर आपला मालकी हक्क असल्याप्रमाणे व्यावसाय थाटत आहेत. यात वाहन दुरुस्ती, पेंटींग, वेल्डिंग अशी कामे केली जात असून ही वाहने नव्याने तयार केलेल्या रस्त्यावरची उभी केली जात आहेत. त्यामुळे चौपदरीकरण करुन रुंद झालेला रस्ता वाहतुकीस फायदेशीर ठरण्याऐवजी अतिक्रमण करुन व्यावसाय करणार्‍यांच्या फायद्याचा ठरला आहे. हे सर्व चित्र या रस्त्याने दररोज प्रवास करणारे शासकीय अधिकारी, पोलिस अधिकारी, लोकप्रतिनिधी उघड्या डोळ्यांनी पाहत असताना हे अतिक्रमण हटवावे असे कुणालाही वाटत नाही. हे विशेष.

सार्वजनिक बांधकाम विभाग व पाटबंधारे विभागाने संबंधित अतिक्रमण धारकांवर संयुक्त कारवाई करणे गरजेचे असतानाही याकडे डोळेझाक होत आहे. त्यामुळे सरकारी जागेच्या अतिक्रमणाला अधिकारीच खतपाणी घालत असल्याचे बोलले जात आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग व पाटबंधारे विभागाच्या जागेची बेकायदेशीर खरेदी करून हे अतिक्रमण वाढत असताना या दोन्ही विभागाबरोबरच बेलापूर ग्रामपंचायतीच्या कोणत्याही पदाधिकार्‍यांनीही याकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे रस्त्याच्या कडेला अतिक्रमण वाढताना दिसत आहे. अतिक्रमण करुन व्यावसायिकांना जागा विक्री केल्याच्या प्रकरणाची चौकशी करुन ही जागा विकणार्‍या व सरकारी जागा आहे हे माहित असताना ती खरेदी करणार्‍या दोघांवरही कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

रस्त्याच्याकडेला व्यवसाय उभारले गेल्याने कायमच वाहनांची व नागरिकांची येथे गर्दी असते. नियम धाब्यावर बसवून रस्त्याच्याकडेला वाहने उभी केली जात असल्याने अपघाताच्या घटना वाढत आहे. त्यामुळे या मार्गाला लागलेले अतिक्रमणाचे ‘ग्रहण’ भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर सुटणार की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

चौपदरीकरणाचा हेतू होतोय असफल

श्रीरामपूर-बेलापूर चौपदरी मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. मात्र त्यासाठी अतिक्रमणाची समस्या सोडविणेही गरजेचे आहे. मात्र असे होताना दिसत नाही उलट या मार्गावर अतिक्रमण करुन व्यवसाय उभारले जात आहे. या व्यावसायिकांनी नव्याने तयार केलेल्या निम्म्या रस्त्याचा ताबा वाहने उभी करण्यासाठी घेतल्याचे रस्त्याचे चौपदरीकरण करुन वाहतूक सुरळीत करण्याचा हेतू असफल झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व पाटबंधारे विभागाने अतिक्रमण हटाव ची संयुक्त कारवाई करणे गरजेचे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या