Saturday, July 27, 2024
Homeनाशिकनविन शाहीमार्गावर अतिक्रमण; रस्त्याला बकाल स्वरुप

नविन शाहीमार्गावर अतिक्रमण; रस्त्याला बकाल स्वरुप

पंचवटी | प्रतिनिधी

गणेशवाडी मरीमाता मंदिरापासून टाळकुटेश्वर पूलापर्यंतच्या नवीन शाहीमार्गाचे स्मार्ट सीटी अंतर्गंत सुशोभिकरण करण्यात आले आहे. स्मार्ट बनविण्यात आलेल्या या रोडच्या पादचारी मार्गावर काही भटक्या लोकांनी झोपड्या उभारल्या आहेत. या झोपड्यांचे अतिक्रमण या स्मार्ट रोडचे ओंगळवाणे दर्शन घडवित आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या स्मार्ट रोडवर होणारे अतिक्रमणाकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष कसे जात नाही, असा प्रश्न नागरिक करीत आहेत.

- Advertisement -

गोदाकाठावरच्या भागात स्मार्ट सीटी अंतर्गत अनेक काम सुरु आहेत. त्यातील नवीन शाहीमार्गाचे काम पूर्णत्वाकडे आहे. या मार्गाचे सुशोभिकरण, त्यावर पथदीप, पेव्हरब्लॉक, नदीच्या बाजूला सिमेंटच्या जाळ्या टाकून या मार्गाचे सुशोभिकरण करण्यात आलेले आहे. वळणाच्या मार्गात पादचारी मार्गही सुरेख बनविण्याचा प्रयत्न केला गेला आहे. बऱ्याच ठिकाणी हा पादचारी मार्ग रुंद असून त्याला आकर्षक डिझाईन करण्यात आले आहे. नेमक्या अशा भागातच काही भटक्या निराक्षित लोकांनी तेथे झोपड्या थाटल्या आहेत.

नाशिकमध्ये येणारे पर्यटक व भाविक हे रामकुंड, काळाराम मंदिर, कपालेश्वर, सीतागुंफा यासारख्या धार्मिक स्थळांना भेटी देतात. त्याच प्रमाणे तपोवनातील पौराणिक स्थळांना भेटी देण्यासाठी याच नवीन शाहीमार्गाने ये-जा करीत असतात. त्यांना या मार्गावर अशा प्रकारे अतिक्रमण केलेल्या झोपड्यांचे ओंगळवाणे दर्शन घडत आहे.

गोदाघाटाच्या परिसरात अशा प्रकारे अतिक्रमण करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पावसाळ्यात येथील अतिक्रमण काढून येथील लोकांची व्यवस्था महापालिकेने निवाराशेडमध्ये केली होती. मात्र, तेथे हे लोक थांबत नाहीत. त्यांनी पुन्हा या भागात अतिक्रमण करीत झोपड्या उभारल्या आहेत. त्यांची संख्या हळूहळू वाढत आहे. झोपड्यांचे अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या