Thursday, December 12, 2024
Homeनगरवाढत्या अतिक्रमणांमुळे श्रीरामपुरातील रस्त्यांचा श्वास कोंडला

वाढत्या अतिक्रमणांमुळे श्रीरामपुरातील रस्त्यांचा श्वास कोंडला

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहराला अतिक्रमण एक लागलेली मोठी कीड आहे. त्यात पलिका व पोलिसांची ढिसाळ कामगिरीमुळे अतिक्रमणधारकांनी आपले प्रस्थ वाढविले. त्यामुळे त्यांचे मनोधर्य वाढत चालले आहे. सदरची अतिक्रमणे काढून शहरातील रस्ते मोकळा श्वास कधी घेतील याची नागरिकांना प्रतीक्षा आहे.

- Advertisement -

श्रीरामपुरातील मेन रोडवर महात्मा गांधी पुतळा ते राम मंदिर चौक भागात पार्किंग झोनच्या बाहेर भर रस्त्यावर अनेक व्यावसायिक आपली दुकाने थाटून बसतात. शिवाय भर रस्त्यावरच वाहनेही लावली जात असल्याने बस, ट्रक आदी मोठ्या वाहनांना कसरत करावी लागते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असते. त्यातून अपघातही होतात.

श्रीरामपुरातील रस्त्यावरील अतिक्रमण हा नेहमीच कळीचा मुद्दा ठरलेला आहे. वारंवार यावर चर्चा होते. मात्र ठोस कारवाई व कार्यवाही होत नसल्याने अतिक्रमणाचा प्रश्न वर्षानुवर्षे भिजत पडलेला आहे. शहरात मेनरोड, शिवाजी रोड, नेवासा रोड, संगमनेर रोड, बेलापूर रोड, गोंधवणी रोड हे मुख्य रस्ते समजले जातात. या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. याशिवाय या मुख्य रस्त्यांना इतर अनेक उपरस्ते जोडलेले आहेत.

या रस्त्यांवरूनही मोठी वाहतूक आहे. मागील काही वर्षांपूर्वी पालिकेने पथ मार्गाची निर्मिती केलेली आहे. त्याच्या आत व्यावसायिक किंवा कार्यालयांची हद्द आहे. वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून व खरेदीसाठी अथवा कार्यालयात येणार्‍या लोकांची वाहने लावण्यासाठी पार्किंग असावी, यासाठी पथमार्गाबाहेरच्या बाजूने नगरपालिका व पोलीस प्रशासनाने पांढरे पट्टे मारलेले आहेत. या पट्ट्याबाहेर वाहने लावलेली असतील तर दंडात्मक कारवाई केली जात होती. मात्र अलिकडच्या काळात ही कारवाई थंडावली आहे. कालांतराने पांढरे पट्टेही बुजू लागले आहेत.

शहरातील छत्रपती शिवाजी रस्ता, नेवासा रस्ता व संगमनेर रस्त्यावर अनेक खाजगी व राष्ट्रीयीकृत बँका आहेत. या बँकांची कार्यालये ज्या इमारतीमध्ये आहेत, तेथे पार्किंगची सोय उपलब्ध नसल्याने भर रस्त्यावर वाहने लावली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. या सर्व बँकांना नगरपालिकेने नोटिसा जारी केल्या आहेत. बँका, कार्यालये व गर्दी होणार्‍या व्यावसायिकांनी स्वतः सुरक्षा रक्षक नियुक्त करणे आवश्यक आहे.

तसेच अनेक दुकानदारांची रस्त्यावर अतिक्रमणे आहेत. अनेकांनी दुकानापुढे लोखंडी अँगल लावून ठेवले आहेत. त्यामुळे मोठी वाहने व दुचाकी गाड्या लावता येत नाहीत. दरम्यान नगरपालिका व पोलीस विभाग यांनी संयुक्तपणे मध्यंतरी दोन तीन दिवस कारवाईचा बडगा उगारला होता. या कारवाईचे स्वागतही झाले. रस्ते अतिक्रमण मुक्त होईपर्यंत कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रशासकीय अधिकार्‍यांनी सांगितले होते. मात्र पुढे मोहीमच थांबली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस अतिक्रमणांची संख्या वाढत आहे.

राजकीय हस्तक्षेपामुळे कारवाई करण्यास प्रशासनाला अडचण येत असली तरी शहरातील वाहतूक व्यवस्था व पार्किंगसह रस्त्यावरील अतिक्रमणाला कुठेतरी शिस्त लावून रस्त्यांचा श्वास मोकळा करणे गरजेचे आहे.

वाहतूक नियंत्रणासाठी श्रीरामपुरात वाहतूक पोलिसांची स्वतंत्र शाखा होती. सध्या ती बंद करण्यात आली असून त्यामधील पोलिसांची शहर व तालुका पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. आधीच पोलीस संख्याबळ कमी, त्यात वाहतूक शाखा बंद केल्याने शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या