राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
राहुरी नगरपरिषद हद्दीमध्ये सुरू असलेली अतिक्रमण हटाव मोहिम वादग्रस्त ठरली असून सर्वोच्च न्यायालयाचा आदेश नगरपरिषद प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने गांभीर्याने न घेतल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान राहुरी शहरातील अतिक्रमण हटाव माहिमेत नवी पेठातील काही दुकाने व नगर-मनमाड महामार्गावरील काही टपर्या प्रशासनाने काढल्या. परंतू, धनदांडग्यांचे अतिक्रमण काढण्यास मुदत दिली. मुदत संपल्यानंतरही संबंधितांनी अतिक्रमण काढून घेतले नाही, पालिका प्रशासनाने विद्यामंदिर ते कुलकर्णी हॉस्पिटल दरम्यानच्या दुकानासमोरील पायर्या काढून अतिक्रमण काढल्याची कारवाई केल्याचा फार्स केला. त्यामुळे सामान्य नागरिकांतून पालिकेच्या या भुमिकेबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.
जिल्ह्यातील इतर तालुक्यात अतिक्रमण विरोधी पथकाने कोणताही हलगर्जीपणा न करता शहरे अतिक्रमण मुक्त केले आहे. मात्र, राहुरीचे पालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रशासन मात्र, आपल्याला कोणत्याही आदेशाचे काहीच घेणे-देणे नसल्याच्या तोर्यात वागताना दिसत असून मनमानी पध्दतीने वागत आहे. विशेष म्हणजे शिवाजी चौक ते कुणकर्णी हॉस्पिटल दरम्यान प्रशासनाने हा रस्ता जवळपास 40 फुटाचा असताना देखील फक्त पायर्या काढण्याची कारवाई केली. तरी काही मुजोर व्यापार्यांनी मुख्याधिकार्यांसमोर पालिका प्रशासनाच्या कर्मचार्यांवर तोंडसुख घेतले. त्यामुळे पालिका प्रशासनावर अतिक्रमण न काढण्यासाठी कोणचा दबाव आहे? हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
तसेच नगर-मनमाड महामार्गावर एका बड्या व्यापार्याची भिंत चक्क अतिक्रमणात असून ही प्रशासनाने ही भिंत काढण्यास सुरूवात केली. यावेळी त्या व्यापार्याने थेट राज्यातील एका मोठ्या नेत्याला फोन लावण्याची धमकी दिली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयापेक्षा हा नेता मोठा की व्यापारी? हा प्रश्न सर्वसामन्यांना पडला आहे. हतबल झालेल्या पथकाने ती भिंत तशीच ठेवली. परंतू ही भिंत तात्काळ काढावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
राहुरी शहरातील शासकीय जागेत अनेकांनी अतिक्रमण करून टपर्या टाकल्या आहे. तर काही जण शहरात व नगर-मनमाड महामार्गावर कुठेही मोकळी जागा दिसली त्या ठिकाणी रात्रीतून टपरी टाकतात. व ती टपरी इतर व्यावसायिकांनी भाड्याने देऊन किंवा विकून टाकून आपले उखळ पांढरे करून घेण्याचा काहींचा उद्योग सुरू आहे. यातील अनेक ‘अतिक्रमण माफिया’ या अतिक्रमण मोहिमेला विरोध करताना दिसत आहे.
राहुरी शहरातील शनि चौक परिसर, शनि चौक ते स्टेशनरोड 5 नंबर नाका, शिवाजी चौक ते विद्यामंदिर, कानिफनाथ चौक ते बालाजी मंदिर परिसर, जुने बसस्थानकाच्या जागेवरील अतिक्रमण मात्र तसेच आहे. संबंधित परिसरात धनदांडगे व्यापारी असल्याने प्रशासनाने दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोपही काही नागरिकांनी केला आहे. तसेच जुने बसस्थानक परिसरातील नगर-मनमाड महामार्गावरील ‘त्या’ एका बड्या व्यापार्याची अतिक्रमणात आलेली भिंत न काढल्याची मोठी चर्चा शहरात सुरू आहे.