नाशिक । प्रतिनिधी Nashik
सराफ बाजार व परिसरात अवैध फेरीवाल्यांचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले असून, सराफ बाजार, कपडा व भांडी बाजारात व्यवसायावर विपरित परिणाम झाला आहे.अतिक्रमित व्यवसायीकांमुळे व्यवसाय ठप्प झाल्याचे चित्र आहे. हा अतिक्रमणाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याची मागणी सराफ संघटनेने मनपा आयुक्तांकडे केली आहे. आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सलग 15 दिवस अतिक्रमण मोहीम राबविण्याच्या सूचना अधिकार्यांना दिल्या आहेत.
मनपा आयुक्तांनी अतिक्रमण उपायुक्त करुणा डहाळे यांना बोलवून तत्काळ कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. उपायुक्तांनी तातडीने परिसरात अतिक्रमण मोहीम राबवून रस्ते मोकळे केले. या कारवाईचा रिपोर्टही आयुक्तांना दिला. आयुक्तांनी व्यावसायीकांना ही कारवाई सलग 15 दिवस सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले. पुन्हा पंधरा दिवसांनी याप्रश्नी आढावा बैठक घेण्याचे आश्वासीत केले असल्याची माहिती अध्यक्ष गिरीश नवसे यांनी दिली आहे.
दरम्यान, आयुक्त व सराफ शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर याप्रश्नी हालचाली गतीमान दिसून आल्या असून दुपारी अतिक्रमण उपायुक्त करूणा डहाळे , पश्चिम विभागाचे विभागिय अधिकारी नितीन नेर यांनी तत्काळ सराफ बाजारात येऊन परिस्थितीची पाहणी केली. मनपाच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई करुन रस्ते मोकळे केले आहेत. मात्र हे चित्र सलग दिसणे गरजेचे आहे. तात्पुरती मलमपट्टी करुन भागणार नसल्याची प्रतिक्रिया सराफ व्यावसायीकांनी दिली.
यावेळी सराफ असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष गिरीश नवसे, सचिव किशोर वडनेरे, माजी अध्यक्ष राजेंद्र दिंडोरकर, राजेंद्र ओढेकर, सुनील महालकर, सचिन वडनेरे, राजेंद्र कुलथे, योगेश दंडगव्हाळ, मुकुंद शहाणे, मनोज साकुरकर, प्रमोद कुलथे, राजेश नागरे, मोनिश भावसार यांसह क्लॉथ मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष नरेश पारख, रामेश्वर जाजू, प्रसाद चौधरी, नितिन वसानी,अमर सोनवणे,अवतारसिंग फनफेर व इतर व्यावसायीकांच्या शिष्टमंडळाच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी राजेंद्र दिंडोरकर व राजेंद्र ओढेकर यांनी याप्रश्नी समस्या मांडल्या.