अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
दलित, आदिवासी, पारधी, भटके, विमुक्त समाजाने निवास व शेती प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या गायरान जमिनीवरून त्यांना हटविण्यासाठी सुरू असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ आदिवासी पारधी संघटना व मानवी हक्क अभियानाच्या वतीने मंगळवारी (दि.29) जिल्हाधिकारी कार्यालयावर बोंबाबोंब मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांनी जोरदार निदर्शने करून शासन-प्रशासनाविरोधात बोंबा मारल्या.
मार्केट यार्ड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जुने बस स्थानक येथील शिवाजी महाराज, वाडियापार्क येथील महात्मा गांधी तर माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाची सुरुवात झाली. या मोर्चात आदिवासी पारधी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र काळे, मानवी हक्क अभियानचे अध्यक्ष मच्छिंद्र गवाले, पारधी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष विजय काळे, महिला जिल्हाध्यक्षा लक्ष्मी पवार, जिल्हाध्यक्ष अजित भोसले, संदीप चव्हाण, अक्षय भोसले, सावकार भोसले, विजय काळे, आरती भोसले, शशिकांत काळे, ऋषिकेश काळे, राम भोसले, बबन काळे, विशाल चव्हाण, नितीन पवार आदींसह दलित, आदिवासी, पारधी, भटके, विमुक्त समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
राज्यासह नगर जिल्ह्यात दलित, आदिवासी, भटके विमुक्त समाज निवास, शेती व इतर कारणांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून राहत आहेत. भटकंती करणारा हा समाज शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करून बालकांचे शिक्षण करत आहे. त्यांच्या कपाळावर लागलेला गुन्हेगारीचा कलंक पुसण्यासाठी मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून 1970 च्या पूर्वीपासून शेती व मोलमजुरी करत आहे.
6 ऑक्टोबर 2022 च्या मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने सरकारी जमिनीवरील शेती आणि निवासी प्रयोजनासाठी केलेल्या अतिक्रमण आदेशानुसार 31 डिसेंबर 2022 पूर्वी निष्कासित करण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईसाठी शासन व पोलीस प्रशासन संयुक्त कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. यामुळे हा दीन-दुबळा भटका समाज भयभीत झाला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.