लंडन –
कोरोनानंतर वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेपासून क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे. ८ जुलै रोजी रंगणार्या या मालिकेच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडचा संघ ’ब्लॅक लाइव्ह्स मॅटर’ हा संदेश घेऊन मैदानावर उतरणार आहे. इंग्लंड संघाच्या जर्सीवर हा संदेश दिसून येईल. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) हा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी विंडीज संघानेही हा लोगो घेऊन मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला होता. आता त्याला इंग्लंड संघाचाही त्यांना पाठिंबा मिळाला आहे. पहिल्या कसोटी इंग्लंडचे कर्णधारपद बेन स्टोक्सकडे सोपवण्यात आले आहे.
ब्लॅक लाइव्हज मॅटर चळवळीला ईसीबीने पाठिंबा दिला आहे. हे वाक्य ऐक्य आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश देते. समाज आणि खेळात वर्णद्वेषाला स्थान असू शकत नाही आणि हे थांबवण्यासाठी आपण पावले उचलली पाहिजेत’’, असे ईसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) टॉम हॅरिसन म्हणाले आहेत.
पहिल्या सामन्याला अनुपस्थित राहणार्या रूटनेही आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ‘कृष्णवर्णीय समुदायाला पाठिंबा दर्शवणे आणि ऐक्य आणि न्याय यांसारख्या विषयांबद्दल जागरूकता वाढवणे ङ्गार महत्वाचे आहे. या चळवळीचा संदेश देण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे व्यासपीठ मदत करेल.‘
अमेरिकेत कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉइडचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. या घटनेनंतर, संपूर्ण जगात संताप व्यक्त झाला आणि येथूनच ’ब्लॅक लाइव्ह्स मॅटर’ चळवळीचा जन्म झाला.