Saturday, January 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजDharmendra Passes Away : अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन; दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली

Dharmendra Passes Away : अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन; दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई | Mumbai

ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेता धर्मेंद्र (Dharmendra ) यांचे आज (सोमवारी) वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. यानंतर मुंबईतील विलेपार्लेच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा सनी देओलने धर्मेंद्र यांना मुखाग्नी दिला. यावेळी अंत्यसंस्कारासाठी अभिनेता अमिताभ बच्चन, सलमान खान, संजय दत्त, आमिर खान यांच्यासह सिनेसृष्टीतील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर घरी उपचार सुरू होते. मात्र, आज (सोमवारी) घरी अचानक गोंधळ उडाला आणि रुग्णवाहिका घेऊन विलेपार्ले येथे नेण्यात आली. यावेळी करण जोहर यांनी धर्मेंद्र यांच्या निधनाची पुष्टी केली. त्यानंतर, बॉलिवूडमधील अनेक कलाकार एकामागून एक स्मशानभूमीत पोहोचले आणि त्यांना निरोप दिला.

YouTube video player

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. धर्मेंद्रजी यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला. ते एक अभूतपूर्व अभिनेता होते, त्यांनी ज्या भूमिका केल्या, त्यामाध्यमातून त्यांनी लोकांच्या मनात घर केलं”, असे मोदींनी म्हटले आहे.

तसेच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Aathawale) यांनी देखील धर्मेंद्र यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केले आहे.”धर्मेंद्र हे एक मोठे अभिनेते होते. त्यांनी ३०० पेक्षा जास्त चित्रपटांत काम केले. केंद्र सरकारच्या वतीने मी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे”, असे रामदास आठवले म्हणाले.

मुख्यमंत्र्यांकडून शोक संदेश

भारतीय चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणारा लखलखता तारा निखळल्याची शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ अभिनेते पद्मभूषण धर्मेंद्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. स्वप्नाळू, युवा नायक ते तडफदार-बलंदड नायक म्हणून साकारलेल्या वैविध्यपूर्ण भूमिका आणि पुढे बॉलिवुडचा हि-मॅन म्हणून लौकीक मिळवेलेले ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र चित्रपट रसिकांच्या सदैव स्मरणात राहतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात की, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा हिंदी चित्रपट सृष्टीतला प्रवास वैशिष्ट्यपूर्ण राहिला. कृष्ण- धवल काळ ते रंगीत आणि अलिकडच्या तांत्रिकदृष्ट्या आधुनिक प्रवाहात ते कार्यशील राहिले. ते चित्रपट सृष्टीतील बदलाचे, भरभराटीपासून ते आतापर्यंतच्या काळाचे महत्वाचे साक्षीदार राहिले. नायक म्हणून तरूण वयात सालस, स्वप्नाळू नायक ते विविध चित्रपटात वाट्याला आलेल्या भूमिका त्यांनी अभिनयाने आयकॉनिक ठरवल्या. शोले चित्रपटातील पडद्यावरील वीरू प्रमाणेच ते प्रत्यक्षातही मैत्र जपणारे होते. सहृदय आणि जुन्या-नव्या पिढीला जोडणारे, अनेकांसाठी आधार, मार्गदर्शक व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती होती. या क्षेत्रातील ज्येष्ठत्व ते तितक्याच उमद्यापणाने मिरवत असत. मध्यंतरी त्यांनी लोकसभेत भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणून बिकानेरचे प्रतिनिधीत्व केले होते. पण त्यांनी चित्रपटसृष्टी आणि अभिनय, या क्षेत्रातील प्रयोगशीलता यांनाच अधिक प्राधान्य दिले. सुमारे तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. एकाच वर्षांत ९ हिट चित्रपट देण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत ते चित्रपट सृष्टीत सक्रिय राहिले. त्यांच्या निधनाने आपल्या चित्रपट सृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणारा तारा निखळला आहे. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनामुळे देओल कुटुंबीयांसह, त्यांच्या चाहत्यांवर दुःखाचा आघात झाला आहे. आम्ही या सर्वांच्या दुःखात सहभागी असून त्यांना ईश्वराने आघात सहन करण्याची ताकद द्यावी, अशी प्रार्थना करतो. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनामुळे चित्रपट सृष्टीची मोठी हानी झाली असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी

ज्येष्ठ अभिनेते धर्मेन्द्रजींचं निधन झालं. भारतीय सिनेमात ‘सुपरस्टार’ म्हणलं की त्याच्या झंझावाताचा एक काळ असतो आणि तो ओसरण्याचा पण एक काळ असतो. पण याला अपवाद म्हणजे धर्मेंद्रजी. एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले, पण सुपरस्टारचं बिरुद त्यांना चिकटलं नाही म्हणा किंवा त्यांनी चिकटू दिलं नाही. मला चिकटू दिलं नाही असंच जास्त वाटतं, कारण धर्मेन्द्रजींच्या बाबतीत त्यांचं प्रतिमेहून प्रत्यक्ष उत्कट असं होतं. १९६० च्या दशकात धर्मेंद्र नावाचा एक देखणा, शरीराने अतिशय सुदृढ, मोहक हास्य, मर्दानीपणा सहज जाणवत असला तरी त्यात कुठेही दांडगाई नाही, अशा एका व्यक्तिमत्वाचा एक तरुण पडद्यावर झळकला आणि पुढे कित्येक दशकं त्याने हिंदी चित्रपटसृष्टीवर गारुड केलं. करिअरच्या सुरुवातीलाच बिमल रॉय यांच्यासारख्या दिग्दर्शकासोबत काम करण्याचं भाग्य कितींच्या वाट्याला येतं? पुढे ऋषिकेश मुखर्जी, चेतन आनंद, रमेश सिप्पी, राज खोसला, मनमोहन देसाई यांच्यासारख्या अनेक दिग्दर्शकांना धर्मेंद्र आपला नायक असावा असं वाटणं यातच धर्मेन्द्रजींच्यातल्या अफाट क्षमतेचं दर्शन होतं. आणि सिनेमाच्या खूप गुंतागुंतीच्या जगातला हा एक सरळ माणूस होता आणि म्हणूनच सर्वसामान्यांनाही तो कायम आपला हिरो वाटत राहिला.

ताज्या बातम्या

मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

0
नांदगाव | प्रतिनिधी Nandgaon मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात येथील एका सहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. या प्रकाराने शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालिका प्रशासनाने...