मुंबई | Mumbai
झी स्टुडियोजची प्रस्तुती असलेल्या आणि सुबोध खानोलकर लिखित दिग्दर्शित ‘दशावतार’ला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच आठवड्यात हाऊसफुल्ल शोजने धमाकेदार सुरुवात केलेल्या या चित्रपटाचा उत्साह तिसऱ्या आठवड्यातही कमी झालेला दिसत नाही. बॉक्स ऑफिसवर भरभरून कमाई करत असलेला हा चित्रपट केवळ कथानकामुळेच नाही, तर प्रभावी मांडणी, दमदार अभिनय आणि आपल्या संस्कृतीशी जोडणाऱ्या आशयामुळेही रसिकांचे मन जिंकतोय.
अनेकदा मराठी चित्रपटाला प्राईम लोकेशन्सवर संधीही मिळत नाही, मिळाली तरी फार काळ टिकत नाही असे चित्र अनेकदा बघायला मिळते. मात्र ‘दशावतार’ने या सगळ्या अडथळ्यांना पार करत थिएटर्समध्ये सलग तीन आठवडे हाऊसफुल्ल शो दिले आहेत. मराठी चित्रपटाने एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठी सोबतच अमराठी प्रेक्षकांची गर्दी खेचली आहे, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे.
पर्यावरण, निसर्ग, कोकणी माणूस आणि दशावतार कलेवर आधारलेले कथानक स्थानिक प्रेक्षकांना इतके भिडले आहे की, ‘खूप काळाने आपल्या मातीची, आपल्या कलेची गोष्ट सांगणारा चित्रपट पाहायला मिळतोय’, अशी भावना तेथील प्रेक्षक व्यक्त करत आहेत.
या चित्रपटाने फक्त बॉक्स ऑफिसवर माया कमावली नाही तर जनमानसात एक चळवळ उभी करण्याचं कामही केले आहे. कोकणातील जमिनी, देवराया, निसर्ग वाचवण्यासाठी कोकणी माणूस पुढाकार घेताना आज दिसत आहे. कोकणातील कातळशिल्पांबाबत, त्याच्या संवर्धनासाठी तो सजग झाला आहे. ज्या दशावतारी कलाप्रकाराचा आधार या चित्रपटात घेतला गेला, ती लोककला आणि दशावतारी कलाकार यांना पुन्हा तेजी मिळवून देण्यासाठी हा चित्रपट कारणीभूत ठरतो आहे. मराठी चित्रपटसृष्टीत आलेली मरगळ झटकून मराठी चित्रपटाची ताकद दाखवून देण्यात दशावतार हा चित्रपट आज अग्रणी ठरला आहे.
झी स्टुडिओजची प्रस्तुती, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊसची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांचे असून त्यांच्यासह सुजय हांडे, ओंकार काटे, अशोक हांडे, आदित्य जोशी, नितिन सहस्त्रबुद्धे, मृणाल सहस्त्रबुद्धे, संजय दुबे आणि विनायक जोशी चित्रपटाचे निर्माते आहेत. अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते असून यात दिलीप प्रभावळकर, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, अभिनय बेर्डे, आरती वडगबाळकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





