मुंबई | Mumbai
बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन (Amitabh Bachchan and Abhishek Bachchan) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गँगस्टर गोल्डी ढिल्लोन (Goldy Dhillon) याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत हा इशारा दिला आहे. या घटनेमुळे बॉलिवूड आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, मुंबई पोलीस (Mumbai Police) हाय-अलर्ट मोडवर आले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांचे मुंबईतील ‘जलसा’ निवासस्थान बॉम्बने (Bomb) उडवून देण्याची धमकी मिळाली होती, तसेच घराबाहेर गोळीबार करण्याचा कटही रचला गेला होता. या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) स्पेशल सेलने मुंबईतून विकास ठाकूर आणि दीपक सिंह या दोन संशयित शूटर्सना अटक केली होती. या शूटर्सचा संबंध बिष्णोई गँगशी असल्याचा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, या अटकेनंतर गँगस्टर गोल्डी ढिल्लोनने फेसबुकवर एक पोस्ट करत जबाबदारी स्वीकारली आणि थेट बच्चन पिता-पुत्रांना लक्ष्य करण्याचा इशारा दिला आहे.
पोस्टमध्ये काय म्हटले आहे?
अटक (Arrested) करण्यात आलेल्या विकास ठाकूर आणि दीपक सिंह यांना इतर कोणत्याही गँगशी जोडू नये, असे गँगस्टर गोल्डी ढिल्लोनने म्हटले आहे. दोघांच्या अटकेमुळे आमचा कट उधळला गेलेला नाही, मुंबईत आमचे आणखी २०० जण तयार आहेत, असा दावा त्याने या पोस्टद्वारे केला आहे. शीख समाजाविरोधात बोलणाऱ्यांना शत्रू मानले जाईल, असे म्हणत दोघांनी कितीही बुलेटप्रूफ केबिन तयार केले तरी आत घुसून हल्ला करू, अशी धमकी पोस्टमधून दिली आहे.
कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
अभिनेता टायगर श्रॉफच्या (Tiger Shroff) गाडीवर झालेल्या गोळीबारानंतर त्याच संशयित आरोपींनी अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याची रेकी केल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी असते, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, ही सोशल मीडिया पोस्ट नेमकी कुठून आणि कोणी केली आहे, याची सायबर पोलिसांकडून सखोल तपासणी सुरू आहे. टायगर श्रॉफ आणि अमिताभ बच्चन यांच्यानंतर आणखी कोणता बॉलिवूड कलाकार गँगस्टरच्या रडारवर आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




