जळगाव । प्रतिनिधी
दि.15 नोव्हेंबर रोजी गुलाबराव पाटील यांनी विकासकामांची यादी मांडत विरोधकांच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिलं. मी चौथी निवडणूक लढतोय, विकासावर बोलायला विरोधकांची हिंमत होत नाही. गिरणा नदीवर बंधारा बांधून दाखवणारच हे माझं पुढचं व्हिजन आहे. विकास हीच माझी जात असून जाती-पातीच्या राजकारणा पेक्षा विकासासाच मोठा विजय होईल असा ठाम विश्वास मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.
येत्या 20 तारखेला धनुष्य बाणाला जास्तीत जास्त मतदान करून मला पुन्हा संधी देण्याचे आवाहन केले. गुलाबराव पाटील यांच्या प्रचार सभेला कानळदा गावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विरोधकांवर घणाघाती टीका करताना संजय पवार यांनी विरोधकांच्या जाती-पातीच्या राजकारणाचा खरपूस समाचार घेतला. माजी आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी विरोधकांवर ताशेरे ओढले. भाजपाचे तालुकाध्यक्ष हर्षल चौधरी, राजेंद्र चव्हाण, सुभाष अण्णा पाटील, संजय पाटील सर, मुकुंदराव नन्नवरे, निलेश पाटील यांनी मनोगत व्यक्त करून गुलाब भाऊंना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी रॉ.का.चे जिल्हाध्यक्ष संजय पवार, सेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, राजेंद्र चव्हाण, चंद्रशेखर अत्तरदे, पवन सोनवणे, सरपंच पुंडलिक सपकाळे, डॉ.कमलाकर पाटील यांच्यासह कानळदा व परिसरातील महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
नशिराबादला मुस्लीम बांधवांचा शिवसेनेत प्रवेश
शिवसेनेची मुलुख मैदान तोफ, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली नशिराबाद येथील 200 हून अधिक मुस्लिम बांधवांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करून त्यांच्या कार्यप्रती विश्वास व्यक्त केला. येथे झालेल्या जाहीर सभेत असलम सर यांच्या मार्गदर्शनाखाली या तरुण आणि ज्येष्ठ मुस्लिम बांधवांनी शिवसेना प्रवेश केला. पाळधी गावात आयोजित विशेष बैठकीत दोन्ही पाळधीतील मुस्लिम बांधवांनी गुलाबराव पाटील यांच्या विजयी व्हावा यासाठी उभा पाठिंबा जाहीर केला.यावेळी माजी ग्रा.पं. सदस्य सत्तार पैलवान, युसूफ खान, जमशेद खान, समीर अली, गुलाम पैलवान, सय्यद लियाकत अली, सय्यद फैजान, करीम कल्ले, दानिश फिरोज पठाण, विकास पाटील, विकास धनगर, चेतन मराठे, लालचंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
गुलाबराव पाटलांच्या प्रचारात युवकांचा उत्साह
कवठळ, धार, शेरी आणि पथराड या गावांमध्ये आज गुलाबराव पाटील यांच्या प्रचार रॅलीने इतिहास रचला. ग्रामस्थांच्या आग्रहास्तव भव्य घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. रॅली दरम्यान गावा – गावांमध्ये उत्साहाला उधाण आले होते. प्रत्येक ठिकाणी रांगोळ्या, भगव्या झेंड्यांची सजावट, आणि फटाक्यांच्या आतषबाजीत गुलाबराव पाटील यांचे दणक्यात स्वागत करण्यात आले. ग्रामस्थांनी धनुष्यबाणाला साथ, विकासाला मत या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. शेकडो महिलांनी औक्षण करून तर युवकांनी पुष्पवृष्टी करून गुलाबराव पाटील यांचे स्वागत करत गावातील निष्ठा आणि प्रेम दाखवून दिले. गावातील मिरवणुकीसाठी विशेषतः सजवलेल्या घोड्यांवरून गुलाबराव पाटील यांचा प्रचार हा ग्रामस्थांसाठी अत्यंत उत्साहवर्धक ठरला. कवठळ, धार, शेरी आणि पथराड येथील स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी आपल्या मोठ्या उपस्थितीने रॅलीचा उत्साह द्विगुणित केला.