शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav
तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांत ढगाळ वातावरण आणि तीन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाचा खरिपातील तूर, रब्बी पिकांवर परिणाम झाला असून शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात कपाशीचे पीक जेमतेम पदरात पडल्यानंतर उभ्या असलेल्या तुरी आणि रब्बीच्या उत्पादनांतून संसाराचा गाडा चालवता येईल या आशेवर असताना अवकाळी पाऊस व सततच्या ढगाळ हवामानामुळे तूर, कांदा, हरभरा, गहू या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. शेतकर्यांसमोर दिवसेंदिवस पिकांगणिक नवे संकट उभे राहत असल्याने शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पावसाचे चक्र पूर्णपणे बदलले असून, प्रत्येक ऋतूत अवकाळी तसेच ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडींचा प्रादुर्भाव होत आहे.
खरीप हंगामात कपाशीची लागवड 7 जूनला झाली परंतु ऐनवेळी पावसाने पाठ फिरवून नंतर सततच्या पावसामुळे कपाशी उत्पादनावर त्याचा परिणाम पहायला मिळाला. उरल्यासुरल्या कपाशी पिकातून घरखर्च भागून उसनवारी देता येईल या आशेवर कपाशी पिकाकडे पाहिले जात असताना कपाशीच्या क्विंटलला साडेसात हजार या हमी भावापेक्षा खाजगी व्यापार्याकडून सुरुवातीला 6500 ते 6800 पर्यंत कपाशी खरेदी करण्यात आली. कपाशीवर झालेल्या खर्चाचा ताळमेळ बसत नसताना बळीराजाकडून पुन्हा रब्बीसाठी कंबर कसून तयारी केली, रब्बी हंगाम ऑक्टोबर महिन्यात सुरु झाल्यानंतर शेतकर्यांकडून काहीप्रमाणात गहू, हरभरा जमिनीआड करण्यात आला.
यामध्ये गहू, हरभर्याची पिकांचा कोवळा कोंब सततच्या ढगाळ वातावरणामुळे पिवळा पडला आहे तर काहींच्या गव्हावर माव्याचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. कांद्याची रोपे व लागवड केलेल्या कांदा तसेच गहू आणि हरभर्याचा पेरा वाया जाऊ नये म्हणून रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बळीराजाकडून औषधाच्या फवारण्या केल्या जात आहेत.
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव कृषी मंडळात एकूण 26 गावे येत असून त्यामध्ये 24 हजार हेक्टर क्षेत्र आहे, यामध्ये कपाशी आणि ऊस ही प्रमुख पिके आहेत. त्यानंतर बाजरी, तूर, सोयाबीन, विविध कडधान्याचा समावेश आहे तर चालू रब्बीतील हंगामामध्ये गहू बाराशे हेक्टर, हरभरा अडीचशे हेक्टर, ज्वारी दोनशे हेक्टर तर कांद्याची आतापर्यंत अडीचशे हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
सध्या वातावरण ढगाळ आणि काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या असून हवामान बदलाचा विषम परिणाम झाला आहे. रब्बीच्या पिकांमधील गव्हावर काळा मावा, तुडतुड्यासाठी थायमेथॉक्झाम दीड ग्रॅम प्रति लिटर पाण्यात, हरभर्यावरील अळीसाठी ईमामेक्टीन बेनझॉईट 8 ग्रॅम प्रति पंधरा लिटर तर कांद्यावर बुरशीजन्य रोगांकरिता थायफोनाईट मिथाईल किंवा टेबिक्विनॅझॉल दिड मिली प्रती लिटर तर आळीसाठी लॅम्बडा सॅलोथ्रीन 20 मिली 15 लिटर पाण्यात मिसळून वापरावे.
– किशोर वाबळे, कृषी सहाय्यक, बोधेगाव कृषी मंडळ