श्रावण आणि भाद्रपदात समाजाला सार्वजनिक सणांचे वेध लागतात. या सणांची नांदी झाली की काही मुद्यांवर हमखास चर्चा सुरु होते. मतमतांतरे व्यक्त होतात. उत्सव पर्यावरण पूरक साजरे व्हायला हवेत ते हिरीरीने म्हंटले जाते. वर्षानुवर्षे हाच सिलसिला सुरु राहातो. सणांच्या काळात संकलित केले जाणारे निर्माल्य हा देखील लक्षवेधी मुद्दा ठरतो.
प्रचंड प्रमाणात जमा होणाऱ्या निर्माल्याचा सदुपयोग करण्याचा एक मार्ग त्रंबकेश्वर देवस्थान आणि तुंगार ट्रस्ट यांनी अंमलात आणला आहे. त्यांनी निर्माल्यापासून अगरबत्ती आणि धूप तयार करण्याचा उपक्रम सुरु केला आहे. या उत्पादनाचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. अनेक सर्जनशील युवा यात अर्थार्जनाच्या संधीही शोधतात. सुरतमधील एका युवतीने याच क्षेत्रात स्वतःचा घरगुती छोटासा उद्योग उभारला आहे. तिच्या परिसरातील मंदिरांमधील निर्माल्य संकलित केले जाते. त्यावर प्रक्रिया करून मेणबत्ती, परफुम्स, रंग, उदबत्ती, धूप अशा विविध प्रकारच्या वस्तू तयार करून त्यांची विक्री ती करते. २०२१ साली राज्यसरकारने ‘रिसायक्लिंग हीरो’ हा पुरस्कार देऊन तिचा गौरव केला होता. ठाण्यातील काही समूह निर्माल्याचा उपयोग सेंद्रिय खत निर्मितीसाठी करतात. अनेक गृहनिर्माण प्रकल्प यात सहभागी होतात. तयार होणारे खत छोट्या बागेत भरून प्रकल्पातील लोकांना वाटले जाते असे समर्थ भारत व्यासपीठ या संस्थेच्या पधाधिकाऱ्यानी माध्यमांना सांगितले. निमाल्याचे असे अनेक उपयोग तज्ज्ञ सुचवतात. सुगंधी साबण बनवणे, वाळलेल्या फुले आणि पानांपासून सुगंधी द्रव्ये तयार करणे, बेल किंवा तुळशीचा काढा बनवणे, गुलाबपाणी तयार करणे, अत्तर बनवणे हे त्यापॆकीच काही. सुकलेल्या निर्माल्यात कापूर मिसळून त्यांची भुकटी तयार करायची. ती चांगल्या तुपात घोळायची. ते मिश्रण पणतीत भरायचे. त्यावर कपूरची वडी पेटवायची. त्यामुळे घरात सुगंधी वातावरण तयार होते असाही एक उपयोग सांगितला जातो. घरच्या घरी देखील खत बनवता येऊ शकते. या उपायांची सविस्तर चर्चा का करायला हवी? कारण निर्माल्यामुळे नदीच्या पाण्याचे होणारे प्रदूषण हा गंभीर आणि संवेदनशील मुद्दा आहे. निर्माल्य पायदळी येऊ नये या भावनेने लोक ते गंगार्पण करतात. ते प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळलेले असते. याचे थरच्या थर नदी पात्रावर तरंगतात. पाणी प्रदूषणाचे ते एक प्रमुख कारण मानले जाते. अनेक सामाजिक संस्था आणि काही व्यक्तिगत पातळीवर नदीपात्रातील निर्माल्याचे संकलन केले जाते. सार्वजनिक सणांच्या काळात चौकांमध्ये, पुलांवर, नदीकिनारी निर्माल्य कलश उभारले जातात. लोकांनी त्यांच्या घरचे निर्माल्य त्यात टाकावे असे आवाहन प्रशासन नेहमीच करते. लोकांनी त्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे. ते करताना लोकांनी एक दक्षता घ्यायला हवी. ते कलश निर्माल्य संकलनाचे असतात. त्यात फक्त निर्माल्य टाकले जावे. तथापि लोक त्यात अन्य प्रकारचा कचराही टाकताना आढळतात. ते टाळायला हवे. संकलित निर्माल्याचे विविध उपयोग केले जातात हे वरील उदाहरणांवरून लोकांच्या लक्षात यावे. अत्यंत पवित्र आणि उदात्त भावनेने लोक घरगुती पूजेत आणि मंदिरांमध्ये फुले-पाने अर्पण करतात. त्यांचे निर्माल्यात रूपांतर झाल्यावरही त्याचा तितकाच उदात्त पुनर्वापर करता येतो याचे वरील उदाहरणे हे त्याचे चपखल नमुने. लोक त्यातील मर्म समजून घेतील. अशी अपेक्षा करावी का?