Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याबनकर-कदमांतच तुल्यबळ लढत

बनकर-कदमांतच तुल्यबळ लढत

निफाड । रावसाहेब उगले Niphad

राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांच्यासह 40हून अधिक आमदार भाजप-शिंदे गटात गेल्याने त्याचा परिणाम निफाड व लासलगाव-येवला विधानसभा मतदारसंघातील आमदारकीचे स्वप्न पाहणार्‍या इच्छुकांच्या मनसुब्यांवर होणार आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. निफाडमध्ये आजी-माजी आमदारांमध्येच टफ फाईट होईल, यात शंका नाही. तर येवला-लासलगाव मतदारसंघात अमृता पवार यांच्यासमोर भुजबळांचे कडवे आव्हान राहील.

- Advertisement -

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रविवारी (दि.2) 40 आमदारांसह भाजप-शिंदे गटाला पाठिंबा दिला आणि सत्तेत सहभागही मिळवला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन इतर आठ सहकार्‍यांनाही मंत्रिपदाचा लाभ मिळवून दिला. या अनपेक्षित घटनेमुळे राज्यासह जिल्हा, तालुकापातळीवरील अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र अजित पवारांनी केलेल्या या बंडखोरीचा परिणाम विधानसभा मतदारसंघात प्रकर्षाने जाणवणार असल्याचे चित्र अधिक स्पष्ट होऊ लागले आहे. कुठल्याही निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्र व जिल्ह्याचे लक्ष निफाड तालुक्यावर असते. शिवाय लासलगाव-येवला विधानसभा मतदारसंघातील लढतही नेहमीच चर्चेत राहिलेली आहे. परंतु अजित पवारांनी केलेल्या बंडामुळे अनेक इच्छुकांचे स्वप्न भंगणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

अमृता पवारांसमोर आव्हान?

काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या देवगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्या अमृता पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्या आगामी विधानसभा निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासमोर आव्हान उभे करतील, अशी जोरदार चर्चा होती. नव्हे तर त्यादृष्टीने अमृता पवार या तयारीला लागल्याचेही चित्र होते. मात्र अजित पवारांसोबत छगन भुजबळदेखील भाजप-शिंदे गटात सहभागी झाल्याने येवला-लासलगाव मतदारसंघात भुजबळ यांचेच आव्हान अमृता पवार यांच्यासमोर उभे ठाकले आहे. त्यामुळे भविष्यात अमृता पवार पुन्हा शरद पवार यांच्यासोबत जातील किंवा अन्य काय भूमिका घेतात याकडे मतदारसंघाचे लक्ष लागून आहे.

आमदार बनकरांची प्रतिष्ठा पणाला

निफाडचे आमदार दिलीप बनकर पूर्वीपासूनच शरद पवार यांचे खंदे समर्थक मानले जातात. अजित पवार यांच्यासह सुप्रिया सुळे यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. आमदार बनकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेसाठी तिकीट मिळेल याची प्रत्येकाला शाश्वती होती. अर्थात, अजित पवार यांनी भाजप-शिंदे गटासोबत जाताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्हावर दावा ठोकल्याने भविष्यात काय घडामोडी घडतात यावर बनकरांचे आगामी राजकीय भवितव्य अवलंबून आहे. सध्यातरी विकासकामांसाठी आपण अजित पवार यांच्या पाठीशी असल्याचे ते सांगत आहेत. बनकरांना तिकीट मिळाल्यास त्यांना माजी आमदार अनिल कदम यांचेच आव्हान राहील.

कदमांचा मार्ग सुकर

निफाडचे माजी आमदार अनिल कदम पूर्वीपासून शिवसेनेचे कट्टर आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड करत 40 आमदारांसोबत भाजपसोबत चूल मांडली. शिवाय शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्हावरही हक्क सांगितला. त्यानंतर अनेकांनी एकनाथ शिंदे गटात जाणे पसंत केले. मात्र अनिल कदम शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले. विशेष म्हणजे ठाकरे गट महाविकास आघाडीत सहभागी असताना आगामी विधानसभा निवडणुकीत दिलीप बनकरांना तिकीट मिळणार की कदम यांना? यावर गावोगावी चर्चा झडत होत्या. दिलीप बनकर यांनी अजित पवारांसोबत जाणे पसंत केल्याने अनिल कदम यांना महाविकास आघाडीकडून तिकीट मिळेल, असा आत्मविश्वास कदम यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांना वाटत आहे.

यतीन कदमांचे स्वप्न भंगणार

दिवंगत आमदार रावसाहेब कदम यांचे पुत्र यतीन कदम यांनी मागील विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करत दिलीप बनकर व अनिल कदम यांना चांगलाच घाम फोडला होता. पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी पुढील निवडणुकीत लढण्यासाठी किमान आपले अस्तित्व निर्माण केले होते. भाजप प्रवेशानंतर त्यांना विधानसभेचे तिकीट मिळेल, अशी चर्चा होती. अजित पवारांसोबत दिलीप बनकर असल्याने यतीन कदम यांना भाजपकडून तिकीट मिळेल का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. विशेष म्हणजे पिंपळगाव बाजार समिती निवडणुकीत यतीन कदम यांनी अपक्ष उमेदवारी करत विजय संपादन केला होता.

क्षीरसागर ‘थांबा-पाहा’ भूमिकेत

बाळासाहेब क्षीरसागर मविप्र संस्थेत सभापती म्हणून निवडून आले आहेत. त्यानंतर लासलगाव बाजार समितीच्या सभापतिपदीही निवड झाली. क्षीरसागर पूर्वाश्रमीचे ठाकरे गटाचे होते. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत चूल मांडल्यानंतर भाजप नेत्यांनी क्षीरसागर यांना आमदारकीची तयारी करावी, अशी गळ घातल्याचे बोलले जात आहे. सध्या तरी क्षीरसागर यांनी ‘थांबा आणि पाहा’ अशी भूमिका घेणे पसंत केले आहे. क्षीरसागर विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगितले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या