Friday, November 1, 2024
Homeशब्दगंधअस्तित्वासाठीची समीकरणे

अस्तित्वासाठीची समीकरणे

गुढीपाडव्यानिमित्त झालेल्या राज ठाकरे यांच्या बहुचर्चित सभेला प्रचंड गर्दी बघायला मिळाली. सभेला गर्दी होते पण येणारे लोक त्या नेत्याला मतदान करतातच असे नाही. नेत्याच्या सर्व मतांचा स्वीकार करण्याची पूर्ण शक्यताही नसते. मात्र असेे असले तरी या सभेने एक वातावरणनिर्मिती केली आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्हीदेखील आहोत, हे दाखवून देण्यात हा पक्ष यशस्वी झाला असे नक्कीच म्हणता येईल.

गुढीपाडव्यानिमित्ताने घेतलेल्या भव्य जाहीर सभेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आळवलेला सूर हा सध्या बहुतेकांच्या चर्चेतला विषय असून त्यामुळे कोणाकोणाचे सूर हरपणार आणि कोणाला नवा सूर गवसणार हा खरा विचारात घेण्याजोगा मुद्दा आहे. हे राजकीय नेतृत्व बराच काळ शांत होते. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्या पक्षात फारशी हालचाल दिसून आली नाही. मात्र, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता जवळ येऊ लागली आहे. त्यामुळे आता त्यांनीही कार्यकर्ते आणि जनतेशी संवाद साधायला सुरुवात केली आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. या महानगरपालिकेची सत्ता मिळणे हे अनेक संधींची दारे उघडून देणारी बाब असते. म्हणूनच या निवडणूक धुमाळीत आपले स्थान कुठे आहे, हे जाणून घेण्याची आणि आपण जनतेसमोर एखादा विषय मांडला तर त्याला कसा प्रतिसाद मिळतो, समाजातून त्याविषयी काय प्रतिक्रिया उमटतात हे जाणून घेण्याची संधीही त्यांनी या निमित्ताने साधली. लोक त्याचा कसा आणि किती प्रमाणात स्वीकार करतात हेही त्यांना पडताळून पाहता आले.

राज ठाकरे यांच्या बहुचर्चित सभेला प्रचंड गर्दी बघायला मिळाली. पण सभेला येणारे सगळे लोक त्यांना मतदान करतातच का? मात्र असे असली तरी या सभेने एक वातावरणनिर्मिती केली आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही देखील आहोत हे दाखवून देण्यात हा पक्ष यशस्वी झाला असे नक्कीच म्हणता येईल. प्रस्थापित राजकीय पक्ष आणि राजकीय नेते यांना देखील याची जाणीव करुन देणारी ही सभा होती.

- Advertisement -

मुख्यत्वे अलिकडेच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता देशातले वारे बदलले आहे. त्यात भाजप देशातला प्रथम क्रमांकाचा पक्ष म्हणून पुन्हा एकदा समोर आला आहे. मागच्या वेळी मुंबई महानगरपालिकेत भाजपची सदस्य संख्या शिवसेनेपेक्षा अगदी चार-पाच अंकांनी कमी होती. म्हणजेच मुंबईत हे दोन्ही पक्ष समतुल्य आहेत. खरे तर तेव्हाही भाजप मुंबई महानगरपालिकेवर दावा करु शकला असता. पण त्यावेळी महाराष्ट्रात शिवसेनेशी युती असल्यामुळे त्यांनी शिवसेनेला ही संधी दिली असे म्हटले जाते. आता मात्र शिवसेनेने भाजपची साथ सोडून अन्य दोन पक्षांशी घरोबा केला आहे. शिवसेना आपले वैचारिक विरोधक असणार्‍या काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याबरोबर सत्तेत आहे. ही सद्यस्थिती आणि येणारी निवडणूक लक्षात घेता राज ठाकरे यांनी खेळलेली ही चतूर खेळी आहे.

महाविकास आघाडी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आघाडी म्हणून लढवेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबद्दल आता शंकाही येऊ लागली आहे, कारण त्यांच्या अडीच ते तीन वर्षांच्या काळात या आघाडीलाही बरेच धक्के बसले आहेत. त्यांचे आपापसात खूप मैत्र आणि सुसंगती आहे असे आपण म्हणू शकत नाही. भाई जगताप आणि नाना पटोले हे दोघेही ही निवडणूक स्वबळावर लढवण्याची भाषा करत आहेत. मधूनमधून ते शिवसेनाला तशी आठवण करुन देत आहेत. या एकूण स्थितीत मनसेला आपल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याची गरज आहे. हे काम या पाडवा मेळाव्याने नक्कीच केले आहे.

आता यावरुन राजकारण रंगणे स्वाभाविक आहे. गेल्या काही दिवसांमधल्या प्रतिक्रिया याची प्रचिती देताना दिसतात. आता सरकार म्हणून शिवसेना काय कारवाई करते हा खरा प्रश्न आहे. मात्र, शिवसेना कारवाई करण्याची चिन्हे दिसून येत नाहीत. थोडक्यात, शिवसेनेकडून या भाषणाविरुद्ध कोणतीही तीव्र प्रतिक्रिया आलेली नाही.

एकीकडे भाजपनेही शिवसेनेसारखा कट्टर हिंदुत्ववादी पक्ष गमावला आहे. त्यामुळे त्यांनाही ही जागा भरुन काढण्यासाठी मनसेसारख्या पक्षाची गरज आहे. यापूर्वी या दोन पक्षांच्या दोन-चार बैठका पार पडल्याचे आपण जाणतो. अगदी अलीकडेही नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांची अनौपचारिक भेट झाली. राज ठाकरे यांच्या नूतन वास्तूला भेट देण्यासाठी हा खासगी दौरा असल्याचे वरकरणी सांगितले जात असले तरी देखील ही केवळ कौटुंबिक भेट असू शकत नाही, हे सर्वसामान्य माणसेही जाणून आहे. स्वत: नितीन गडकरी महाराष्ट्रातल्या राजकारणावर पक्षाची भूमिका जाहीरपणे बोलणार नाहीत. याविषयी बोलण्याचे अधिकार चंद्रकांतदादा पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत. त्यामुळेच राज ठाकरे आणि गडकरी यांच्या या भेटीला राजकीयदृष्ट्या फार महत्त्व दिले गेले नसावे. पण लवकरच याविषयी काही ठोस भूमिका ऐकायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येतील तसा या हालचालींना वेग आल्याचे आपल्याला पहायला मिळेल. तेव्हाच याबाबतची भाजपची भूमिका स्पष्ट होईल.

मनसेबाबत बोलायचे तर गेल्या वेळी नाशिकमध्ये त्यांची सत्ता होती. मात्र आज तिथे या पक्षाचे काय स्थान आहे? राज ठाकरे यांनी याविषयी देखील नाराजी व्यक्त केली. आपण कामे करुनही लोकांनी प्रतिसाद दिला नसल्याची आठवण त्यांनी चाणाक्षणपणे करुन दिली आणि तुम्ही आम्हाला साथ दिली नाही तर आम्ही तुमची कामे का करु? असा खडा प्रश्नही विचारला. त्यांच्या या वक्तव्याचा मतदारांवर काय परिणाम होईल हे येणार्‍या काळात बघायला मिळेल.

राज ठाकरे आणि भाजप यांच्यातल्या संबंधाचा आढावा घ्यायचा तर सुरूवातीला त्यांची नरेंद्र मोदींशी चांगली जवळीक झाली होती. गुजरातला भेट देऊन राज ठाकरे यांनी तिथल्या विकासाचं कौतुकही केले होते. मध्यंतरीच्या काळात हे चित्र बदलले आणि या दोघांमधले संबंध तणावग्रस्त आहेत की काय, अशी शंका येऊ लागली. मात्र आता पुन्हा एकदा हे चित्र पालटत असल्याचे दिसत आहे. अर्थातच एका सभेने अथवा एका भाषणाने असा अंदाज बांधणे आणि त्याचे राजकीय परिणाम काय होतील याविषयी ठोस चर्चा करणे थोडे घाईचे ठरेल. त्यामुळेच काही काळ थांबूनच याविषयीचे स्पष्ट चित्र दिसेल. तेव्हा वाट पाहू या.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या