मुक्ताईनगर । प्रतिनिधी –
मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकात सुमारे 4 कोटी रु. निधीतून मंजूर आणि प्रगतीत असलेल्या शिवसृष्टीमध्ये सुमारे 30 फूट उंचीच्या चबुतर्यावर 25 फूट उंचीचा अतिशय रुबाबदार ब्राँझ धातूचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा दि.16 नोव्हेंबर रोजी हजारो शिवप्रेमी बांधवांच्या उपस्थितीत स्थापन करण्यात आला. यावेळी गगनभेदी घोषणा व गर्जनांनी मुक्ताईनगर शहर दुमदुमून गेले होते.
ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून शिवरायांच्या पुतळ्याचे स्वागत होत होते.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे बर्हाणपूर रोडने शहरात आगमन होत असताना मुस्लिम समाज बांधवांनी जेसीबीवर उभे राहून पुष्पवृष्टी करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अभूतपूर्व स्वागत केले. यातून मुक्ताईनगर शहरातील हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडून आले.
शहरातील प्रवर्तन चौकात छत्रपती शिवरायांचा पुतळा आणल्यावर क्रेनच्या सहाय्याने नियोजित ठिकाणी चबुतर्यावर पुतळा स्थापन झाल्यावर शिवप्रेमी बांधवांनी एकच जल्लोष केला. यावेळी सर्वांच्या अंगावर शहारे आले होते. आदिशक्ती मुक्ताई तीर्थक्षेत्र असलेल्या मुक्ताईनगरीत शिव पुतळा विराजमान झाल्यानंतर नागरिक युवक, महिला समाधान व्यक्त करीत होते.
दुसर्या दिवशी सकाळीही नागरिकांनी पुतळा पाहण्यासाठी व सेल्फी काढण्यासाठी एकच गर्दी केलेली दिसून येत होती. पुतळा स्थापन झाल्यावर महाआरतीने पुतळा स्थापन सोहळ्याची सांगता झाली.हा पुतळा येथे विराजमान व्हावा यासाठी आ. चंद्रकांत पाटील यांचा शासन दरबारी पाठपुरावा सुरू होता.
जय शंभुराजे बहुउद्देशीय संस्था, मुक्ताईनगर यांच्या वतीने देखभाल दुरुस्तीची हमी देऊन तसेच शासनाकडून पुतळा परवानगीसाठी मागण्यात आलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून परवानगी मिळवलेली आहे. त्यानंतर येथे सुमारे चार कोटी रुपयांची शिवसृष्टी देखील मंजूर झालेली असून हे काम देखील आता प्रगतीत आहे, त्यामुळे भविष्यात आदिशक्ती संत मुक्ताईच्या दर्शनासाठी येणारा भाविक वारकरी तसेच पर्यटक यांना मुक्ताईनगर छत्रपती शिवरायांच्या दर्शनासह आकर्षक शिवसृष्टीचे देखील आकर्षण असणार आहे. यावेळी हजारो शिव प्रेमी बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




