कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav
समन्यायी पाणी वाटप कायदा नगर जिल्ह्यातील शेतकर्यांच्या मुळावर उठला आहे. सध्या पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून अशा परिस्थितीत समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात पाणी सोडल्यास नगर जिल्ह्यातील जनतेच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. त्यामुळे नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात येऊ नये, अशी मागणी भाजप नेत्या स्नेहलता कोल्हे यांनी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांकडे केेलेल्या मागणीत त्यांनी म्हटले आहे, 2005 मध्ये तत्कालीन सरकारने बनविलेला समन्यायी पाणीवाटप कायदा नगर व नाशिक जिल्ह्यातील शेतकर्यांवर अन्याय करणारा आहे. उर्ध्व गोदावरी खोरे हे अतितुटीचे असून समन्यायी पाणीवाटप कायद्याचा आधार घेत दरवर्षी नाशिक-नगरचे पाणी मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात सोडले जात असल्याने बारमाही गोदावरी कालवे लाभधारक शेतकर्यांच्या हक्काच्या पाण्यावर गदा आली आहे. त्यामुळे गोदावरी डावा व उजवा कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकर्यांना हक्काचे पाणी मिळत नसल्याने या परिसरातील शेती उद्ध्वस्त झाली आहे.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकरी व जनतेवर अन्याय करणारा हा कायदा विधिमंडळात संमत केला जात असताना या मतदारसंघाच्या तत्कालीन लोकप्रतिनिधींनी या कायद्याला कशी काय संमती दिली? असा परखड सवाल स्नेहलता कोल्हे यांनी उपस्थित केला आहे.
स्थानिक आमदार म्हणतात की, मी कोपरगावच्या विकासासाठी 2100 कोटींचा निधी आणला. एवढा निधी जर मिळाला असता तर गोदावरी खोर्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला असता. त्यांना फक्त प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची सवय लागलेली आहे. कृष्णा खोर्यातील कामाला ज्याप्रमाणे गती दिली होती त्याप्रमाणे पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी पूर्वेला ऊर्ध्व गोदावरी खोर्यात वळवण्याच्या प्रकल्पास गती देण्यात यावी, जेणेकरून नगर, नाशिक जिल्ह्यांसह मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघेल. नगर, नाशिक विरुद्ध मराठवाडा यांच्यातील पाण्याचा वाद कायमस्वरूपी मिटविण्यासाठी सर्व पक्षांच्या आमदार, लोकप्रतिनिधी व नेत्यांनी एकत्र येऊन पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेला ऊर्ध्व गोदावरी खोर्यात वळवण्याच्या प्रकल्पास गती देण्यासाठी तसेच या प्रकल्पास केंद्र व राज्य शासनाकडून जास्तीत जास्त निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहन स्नेहलता कोल्हे यांनी केले आहे.
कोपरगाव तालुक्यात पाण्याचा व विजेचा खेळखंडोबा सुरू असून दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकर्यांसह सर्वच समाजघटक हवालदिल झाले आहेत. अशा परिस्थितीत केवळ निवेदने देऊन, नाममात्र बैठका घेऊन आणि कोरडी आश्वासने देऊन काहीच होणार नाही तर दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी, वीज, चारा व रोजगाराचा प्रश्न प्राधान्याने सोडवला पाहिजे. यासाठी लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रणेने तात्काळ ठोस पावले उचलणे गरजेचे आहे, अशी सूचना स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.