अमेरिकेच्या भूमीवर युरोपिअन वसाहती स्थापन्यास कोलंबसापासून सुरवात झाली. व्यापारवृद्धी हा अमेरिकेच्या भूमीवर जाण्यासाठी आसुसलेल्या प्रत्येक युरोपिअन देशाचा एकमेव हेतू होता. नव्याने शोध लागलेल्या या भूमीवरील देशांशी व्यापारीसंबंध स्थापन करावेत, अशी कल्पना मनात ठेवून युरोपिअन लोक या भूमीवर पोहचले. येथे पोहचल्यावर मात्र त्यांना उमगले की, या भूमीवर कोणा एका राजाचे सार्वभौम असे राज्य नाही.
एवढेच काय राष्ट्र वा देश वा राज्य अशी संकल्पनांशी अत्यंत आदिम अवस्थेत असणारा मूलनिवासी अमेरिकन समाज अनभिज्ञ आहे. काही इतिहासकारांनी अमेरिका खंडावर वर्चस्व स्थापन करण्यात यश प्राप्त केलेल्या युरोपिअन लोकांचा इतिहास अधिक काळा करण्यासाठी वेगळेच चित्र रंगवले. त्यांच्यानुसार स्पॅनिश लोक जेंव्हा अमेरिका खंडावर पोहचले,तेंव्हा या भूखंडावर अति सभ्य व सुसंस्कृत मानवी समाजाचा रहिवास होता. त्यांचे अनेक साम्राज्यं अस्तित्वात होती.
समृद्धी आणि संपत्ती यांची तूलना करता, हे लोक युरोपिअनांशी कोणत्याच बाबतीत कमी नव्हते. स्पॅनिश लोकांच्या संहारक शक्तीसमोर ते टिकू शकले नाही. स्पेनने त्यांचा पराभव करून ही भूमी बळकावली. स्पॅनिश लोकांनी मूलनिवासी लोकांचा अत्यंत निर्दय व क्रुरतेने संहार केला. त्यांच्या तावडीतून जे मूलनिवासी बचावले, त्यांना जंगालांचा आश्रय घेऊन,अत्यंत हालाखीचे जीवन व्यतीत करावे लागले इत्यादी इत्यादी. कोणताही पूर्वग्रह न ठेवता केवळ इतिहास म्हणून विचार केल्यास आणि ऐतिहासिक तथ्ये जाणल्यास एक वेगळेच तथ्य समोर येते.
अमेरिका खंडांचे मूलनिवासी ज्यांना युरोपिअन लोकांनी इंडियन अथवरेड इंडियन असे संबोधले. हे लोक आदिम अवस्थेत होते. त्यांच्या विविध जमातींच्या टोळया होत्या. युरोपिअन त्यांच्या भूमीवर आले,तेंव्हा त्यांची नेमकी लोकसंख्या किती होती, याविषयी अनेक अंदाज विविध अभ्यासकांनी वर्तवलेले आहेत. अभ्यासकांनी सांगितलेल्या आकडेवा-या कायम वादाग्रस्तच ठरल्या.
हेन्री डोब्यान्स या अमेरिकन मानवंशशास्त्रज्ञाने १९६५ साली रेड इंडियन्सची लोकसंख्या एक कोटीच्यावर होती. असा अंदाज वर्तवला. त्याने याविषयी आपले संशोधन सुरूच ठेवले. १९८३ साली याच हेन्री डोब्यान्सने इंडियन्सची लोकसंख्या १ कोटी ८० लाख असावी आणि १८९० सालापर्यंत यापैकी केवळ अडिच लाख लोक शिल्लक राहिले असा निष्कर्ष मांडला.
१६०० ते १८९० या सुमारे तीनशे वर्षांमध्ये मूलनिवासी लोकांची लोकसंख्या घटण्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांची युरोपिअनांकडून झालेली अमानुष कत्तल. असाच समज प्रदीर्घ काळ कायम होता. वास्तव मात्र वेगळे होते. युरोपिअनांनी केलेली कत्तल हे पहिले कारण आणि त्यांच्यासोबत आलेले विविध साथीचे रोग हे दुसरे कारण होते. युरोपिअनांनी इंडियन्सची भूमी बळकावणे आणि त्यांची अमानुष कत्तल करणे यासाठी या दोन समाजात झालेला रक्तरंजित संघर्ष याचा सर्वप्रथम विचार करू.
स्पॅनिश लोक या भूमीवर आले, तेंव्हा त्यांनी स्थानिकांचा पराभव केला. तसेच त्यांचे शिरकाण केले. एवढे हे सोपे होते का ? मूठभर संख्येनं आलेल्या स्पॅनिश व इतर युरोपिअनांना सुमारे दोन कोटी स्थानिकांचा पराभव करणे आणि त्यांचा नायनाट करणे शक्य होते का ? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी विवेक व वास्तव यांचा आधार घ्यावा लागतो.
मुठभर इंग्रज व इतर युरोपिअनांनी व्यापारी उद्देश्याने जगाच्या विविध देशांमध्ये प्रवेश करून तेथे राजसत्ता स्थापन केली. हा इतिहास यासाठी डोळयासमोर आणावा लागतो. १९४७ साली इंग्रजांनी जेंव्हा भारत सोडला,त्यावेळी भारताची लोकसंख्या सुमारे ३३ कोटी होती. तसेच भारतातील इंग्रजांची लोकसंख्या केवळ दिड लाख होती. असे असतांना दिडशे वर्ष त्यांनी भारतावर राज्य केले. राजसत्ता हस्तगत करणे आणि तिचा कारभार चालवणे, हे स्थानिकांच्या सहकार्याशिवाय शक्य नव्हते. भारतावर राज्य करणा-या प्रत्येक परकिय राजवटींचा इतिहास देखील हाच आहे.
म्हणजेच काही स्थानिक लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी केलेले सहकार्य आणि पाहुण्याच्या हातून साप मारण्याची वृत्ती याशिवाय हे शक्य नाही. नेमके हेच अमेरिका खंडात घडले. मूलनिवासी इंडियन्सच्या विविध जमाती टोळयांनी राहत होत्या. मानवी वृत्तीनुसार त्यांच्यात आपापसात वैर असणारच. यामुळे यातील काही टोळयांनी इतरांचा वचपा काढण्यासाठी स्पॅनिश लोकांना सहकार्य केले. तर काही स्वार्थी लोकांनी क्षणिक लाभासाठी स्वतःच्याच टोळीचा पराभव करण्यासाठी त्यांना साथ दिली.
आधुनिक शस्त्रास्त्र, संघटित व शिस्तबद्ध सैन्य, घोडदळ आणि तोफखाना या मुठभर स्पॅनिशांच्या जमेच्या बाजू होत्या. त्यांना काही स्थानिक टोळयांची साथ लाभल्याने,इतर टोळयांवर विजय मिळवणे सहज शक्य झाले. यामुळेच १५९९ ते १५२१ या तीन वर्षांच्या कालखंडात स्पेनने मेक्सिको व टॅक्सकाला हे उत्तरेकडचे प्रदेश काबीज केले. दक्षिण अमेरिकेत हेच घडले.
आज जो देश पेरू म्हणून ओळखला जातो, तो इन्का जमातीचा प्रदेश होता. त्याचा इन्का म्हणूनच इतिहासात उल्लेख करण्यात आलेला आहे. फ्रांसिको पिझारो याने इन्का जमातीतलच चाळीस हजार लोकांना सोबत घेऊन त्यांच्याच जमातीचा पराभव केला. अशी अनेक उदाहरणं सांगता येतात. यामध्ये युरोपिनांनी स्थानिक इंडियन्सची अमानुष व अमर्याद कत्तल केली. त्यांची भूमी बळकवण्यासाठी हे करावेच लागणार होते. त्यामुळे त्यांची लोकसंख्या कमी होणे अपरिहार्यच होते.
अशाप्रकारे १५०० सालापासून प्रारंभ झालेला हा वसाहतवाद १७०० व्या शतकापर्यंत सुरू होता. अमेरिका खंडाची अशी परिस्थिती असल्यामुळे व्यापारी हेतूने आलेल्या युरोपिअनांना व्यापारा ऐवजी भूमी संपादन करण्याची व स्वतःच्या वसाहती स्थापन करण्याची संधी प्राप्त झाली. या वसाहतवादयांनी आपल्यासमवेत विविध साथींचे रोगसुद्धा या भूमीवर आणले. येथील समाजाला व पर्यावरणाला नवीन असलेल्या विषाणू-जंतू यांच्या प्रार्दुभावाचा आहेर युरोपिअनांनी केला. अत्यंत मागास व आदिम जीवन जगणा-या या जमाती होत्या. आधुनिक जग व आधुनिकता यांचा गंधही त्यांना झालेला नव्हता. सभ्य, सुसंस्कृत व आधुनिक जगापासून अनभिज्ञ असा हा स्थानिक मानवी समाज,साथींच्या रोगांना मोठया प्रमाणात बळी पडला.
अशाप्रकारे वसाहतवादी व स्थानिक यांच्या संघर्षात सर्वाधिक स्थानिक लोकसंख्या कमी झाली असली तरी साथीच्या रोगांनीही याला हातभार लावला. पराभूतांनी निर्मार्ण केलेले साहित्य-कला आणि सहानुभूतीपूर्वक लिहिलेला इतिहास यामधून त्यांच्यावरील अन्याय, त्यांचे शोषण व अमानुष अत्याचार यासंदर्भात माहिती मिळत असते. दुसऱ्या बाजूला जेते मात्र स्वतःच्या यशाच्या विजयगाथा लिहितात व पराक्रमाचे पोवाडे गातात.
अमेरिकेच्या बाबतीत पराभूतच शिल्लक न राहिल्याने इतरांनीच त्यांची बाजू मांडणारा इतिहास लिहिला. असो शेवटी इतिहासाचा अन्वयार्थ प्रत्येक समाजाने स्वतःच्या यशापयाशाच्या पार्श्वभूमीवर लावलेला असतो. वसाहती निर्माण करण्यात सर्वप्रथम आघाडी स्पेनने घेतली होती.
फ्रांस, इटली, जर्मनी, डच आणि स्वीडन वसाहती वसवण्याच्या शर्यतीत सहभागी होते. स्पेनने दक्षिण अमेरिकेतील मेक्सि्को आणि अमेरिकेच्या प्रशांत महासागराच्या किनारी प्रदेशावर आपला कब्जा केला होता. ईतर देशांच्या तुलनेत स्पेनला यासाठी अत्यंत कमी संघर्ष करुन,हे यश संपादन करता आले. इंग्लड उत्तर व मध्य पूर्व अमेरिकेत वसाहती उभारत होता.
अटलांटिक महासागराचा किनारी प्रदेश ही त्याने बळकवला होता. इंग्लडमधील बदललेली राजवट आणि धर्मक्रांती यांनी इंग्लडची धोरणं बदलली व सामर्थ्य वाढत गेले. एकवेळ अमेरिकन भूमी बळकवण्याच्या शर्यतीत अशक्त नाविक साधनांमुळे मागे असलेला इंग्लड, आज अमेरिका म्हणून ओळखल्या जाणा-या भूमीचा मालक झाला. स्पेनसह इतर देशांना त्याने या भूमीत पिछाडीवर टाकले. १६०७ साली इंग्लडने आपली पहिली वसाहत अमेरिकेच्या धरतीवर स्थापन केली. इंग्लडची ही पहिली वसाहत आजच्या अमेरिकेची नांदी ठरली.
-प्रा.डॉ.राहुल हांडे,
भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
(लेखक धर्म इतिहास व साहित्य अभ्यासक आहेत)