मुंबई l Mumbai
ठाकरे कुटुंब आणि नाईक कुटुंबीयांमध्ये २१ जमीनींचे व्यवहार झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांच्या या आरोपांनंतर शिवसेना नेत्यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे. दरम्यान शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
संजय राऊत यांनी म्हंटले आहे की, “सोमय्यां यांनी ठाकरे कुटुंबीयांवर केलेल्या आरोपांबाबत आम्ही काही बोलावं अस कोणतंही महान काम त्यांनी केलेलं नाही. ते जे करतात त्याच्याकडे त्यांचा पक्षही गांभीर्याने पाहत नाही. यामुळे अशा विधानांमुळे आपल्याच पक्षावरील लोकांचा विश्वास उडतो याचं त्यांनी भान ठेवावं. हे खोटे नाटे आरोप करणं बंद करावं, जुनी थडगी उकरायची म्हटलं तर आम्हालाही उकरता येतात. ती आम्ही उकरली तर त्यात तुमच्याच पापांचे सांगाडे जास्त सापडतील.”
तसेच “महाराष्ट्रात सरकार पाडण्यासाठी विरोधकांनी वर्षभरात अनेक ऑपरेशन करण्याचा प्रयत्न केला पण सरकारला थोडंही खरचटलं नाही. त्यामुळं त्यांनी ही भाषा बंद केली पाहिजे आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठी विरोधी पक्षानं सहकार्याची भावना ठेवावी,” असंही राऊत म्हणाले आहेत.
किरीट सोमय्यांवर अब्रु नुकसानीचा दावा ?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात २१ व्यवहार झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला. असे व्यवहार झाले असतील तर सोमय्यांनी सिद्ध करावे असे आव्हान शिवसेना नेते रविंद्र वायकर यांनी दिलंय. तसेच सोमय्यांना कायदेशीर मार्गाने उत्तर देणार असून अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे वायकर यावेळी म्हणाले. अन्वय नाईक यांच्या कुटुंबियांसोबत झालेला व्यवहार पूर्णतः कायदेशीर मार्गाने झालेला आहे. याची नोंदही आम्ही निवडणूक प्रतिज्ञापत्रात केली आहे, आयकर विभागालाही कळवलं असल्याचे वायकर म्हणाले.
मराठी माणसानं कोकणात कायदेशीर मार्गानं जमिनी घ्यायच्या की नाहीत ? की फक्त परप्रांतियांनी घ्यायच्या ? असा प्रश्न वायकरांनी उपस्थित केला. ३० व्यवहार अजिबात झालेले नाहीत, झाले असतील तर सिद्ध करावेत. बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल असे वायकर म्हणाले.