नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road
येथील बिटको रूग्णालयामध्ये (Bitco Hospital) अनेक समस्या निर्माण झाल्या असून त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत. बिटको रूग्णालयामधील समस्या महापालिका प्रशासनाने तातडीने सोडवाव्या अन्यथा रूग्णालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा माजी नगरसेवक जगदीश पवार (Former corporator Jagdish Pawar) यांनी दिला आहे…
याबाबत अधिक माहिती देतांना पवार म्हणाले की, बिटको रुग्णालय हे नाशिक (Nashik) शहरातील सर्वात मोठे रुग्णालय असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झालेल्या आहेत. मनपाने कोट्यावधी रुपये खर्च करून बिटको रूग्णालयासाठी नवीन इमारत बांधली. परंतु ही इमारत केवळ एखाद्या शोरूम सारखी झाली आहे. बिटको रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी नाशिकरोडसह ग्रामीण भागातील गोरगरीब नागरिक येतात. परंतु अद्यापही ग्रामीण भागातील नागरिकांना नवीन रुग्णालयाची इमारत माहिती नाही.
या नवीन इमारतीत कॅज्युअलिटी विभागात रात्री एकच सीएमओ व सिस्टर तसेच वॉर्डबॉय असतो. अपुर्या कर्मचारी संख्येमुळे रुग्णांचे (Patients) हाल होतात. कधी कधी रूग्णालयामधील वीजपुरवठा खंडित झाल्यास लिफ्ट बंद पडते. त्यामुळे रुग्ण त्यांचे नातेवाईक तसेच डॉक्टरांनाही त्याचा त्रास होतो. अचानकपणे गंभीर रुग्ण आला तर वेळप्रसंगी कर्मचारी धावून जात नाहीत, त्यामुळे नातेवाईकांना रुग्णाला घेऊन रूग्णालयामध्ये जावे लागते.
रूग्णालयामध्ये अद्यापही अनेक तज्ञ व स्पेशलिस्ट डॉक्टरांची कमतरता असल्यामुळे गोरगरीब नागरिकांना खाजगी रुग्णालयात धाव घ्यावी लागते. अद्यापही एक्स-रे मशीन जुन्या बिटको रुग्णालयात आहे. त्यामुळे अपघात (Accident) झालेल्या किंवा इतर गंभीर रुग्णांना हेलपाटा मारून जुन्या इमारतीत एक्स रे काढण्यासाठी जावे लागते. नवीन रूग्णालयामध्ये स्थलांतर झाले असल्यामुळे बिटको रुग्णालयाची जुनी इमारत धुळ खात पडली असून या इमारतीचा उपयोग मनपाने इतर कामासाठी करावा.
तसेच वेळेवर मानधन मिळत नसल्यामुळे अनेक डॉक्टर नोकरी सोडून गेले आहेत. फिजिशियन नसल्यामुळे अनेक रुग्णांचे हाल होत आहेत. या सर्व बाबींचा विचार करून मनपाने त्वरित उपाययोजना करून समस्या सोडवाव्या. अन्यथा उपोषण (Hunger Strike) करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही पवार यांनी दिला आहे.