Friday, May 31, 2024
Homeनगरमाजी सैनिक खून प्रकरण; खुनासाठी वापरलेले हत्यार फेकले नदीत !

माजी सैनिक खून प्रकरण; खुनासाठी वापरलेले हत्यार फेकले नदीत !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जागा खरेदी-विक्रीच्या वादातून माजी सैनिक विठ्ठल नारायण भोर (वय 48, रा. गणेश चौक, बोल्हेगाव) यांच्या खूनप्रकरणी अटकेत असलेला संशयित आरोपी मनोज वासुमल मोतीयानी (वय 33) व स्वामी प्रकाश गोसावी (वय 28, दोघे रा. सावेडी) यांची राहाता न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. दरम्यान, गुन्ह्यातील हत्यार पोलिसांना अद्यापही हस्तगत करता आलेले नाहीत. आरोपींनी पुरावे नष्ट केल्याने गुन्ह्यात कलम वाढवण्यात येणार असल्याचे लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक युवराज आठरे यांनी सांगितले.

- Advertisement -

लोणी ते तळेगाव रस्त्यावर गोगलगाव (ता. राहाता) शिवारात भोर यांचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत लोणी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोतीयानी व गोसावी यांना संशयावरून अटक केली आहे. दोनही आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मंगळवारी कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.

आरोपींनी निंबळक येथे भोर यांचा खून करून गोगलगाव शिवारात मृतदेह आणून टाकला. खुनासाठी वापरलेले हत्यार भोपाळ परिसरातील नदीत फेकून देत पुरावा नष्ट केला आहे, असे पोलिसांनी सांगितले. आरोपींच्या वतीने अ‍ॅड. महेश तवले व अ‍ॅड. संजय दुशिंग यांनी बाजू मांडली. पोलिसांना तपासासाठी पोलीस कोठडी देण्यात आली होती. मुळातच आरोपींना संशयित म्हणून अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून पुरावे हस्तगत झालेले नाहीत. त्यामुळे त्यांना पोलीस कोठडी वाढवून देण्याची गरज नाही, असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला. त्यानंतर न्यायालयाने दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या