अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मागील दीड महिन्यांत अतिवृष्टी झाली होती. जिल्हा प्रशासनाने या अतिवृष्टीचे पंचनामे देखील केले. मात्र, शेतकर्यांना अजूनही कोणत्याच प्रकारची नुकसान भरपाई दिलेली नाही. जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकर्यांना राज्य शासनाकडून तातडीची आर्थिक मदत मिळण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या भागातील विशेषतः शेवगाव-पाथर्डी, नगर तालुक्यातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. त्याकरिता शेतकर्यांना राज्य शासनाकडून तातडीची आर्थिक मदत मिळण्यासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी मंत्री प्रा. राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांच्या मार्गदर्शनाखाली लाक्षणिक उपोषण करण्यात आले. दिलीप भालसिंग, संतोष म्हस्के, सुजित झावरे यांच्यासह भाजपाचे प्रमुख कार्यकर्ते या लाक्षणिक उपोषणात सहभागी झाले होते. खा. डॉ. विखे म्हणाले, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टी झाली तरी जिल्ह्याचे पालकमंत्री पाहणी करण्यासाठी आले नाहीत. शेतकर्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
प्रा. शिंदे म्हणाले की, जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यावेळी आम्ही जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली होती की, संसारोपयोगी वस्तू व तातडीची मदत द्या. ही मदत 24 तासांत द्यायची असते. दीड महिना झाला तरी आजपर्यंत नुकसान भरपाई दिली नाही. नुकसानीचे पंचनामे झाले त्याचीही नुकसान भरपाई मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले.