Tuesday, November 26, 2024
Homeअग्रलेखकचरा व्यवस्थापनाचे अनुकरणीय उपक्रम

कचरा व्यवस्थापनाचे अनुकरणीय उपक्रम

कचरा प्रदूषण ही जुनाट समस्या बनली आहे. सर्व प्रकारच्या कचर्‍याचे, विशेषत: इ कचरा आणि प्लास्टिक कचर्‍याचे वाढत जाणारे प्रमाण आणि त्याचे व्यवस्थापन ही माणसाची डोकेदुखी ठरत आहे. प्लास्टिक कचरा निर्मितीत महाराष्ट्र राज्य देशात दुसर्‍या क्रमांकावर आहे. देशात रोज साधारणत: सव्वीस हजार टन प्लास्टिकचा कचरा जमा होतो आणि त्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त कचर्‍याचे व्यवस्थापन केले जात नाही असे सांगितले जाते. म्हणजे तोच कचरा इतस्तत: पसरलेला असतो.

जो समुद्र, नद्या, नाले, डोंगर आणि रस्त्यांवर साठत जातो. काही प्रकारच्या प्लास्टिकचे काहीशे वर्षे विघटन होत नाही. ते तसेच राहते. या कचर्‍याचे व्यवस्थापन करण्याचे वेगवेगळे मार्ग शासन आणि अनेक सामाजिक संस्था शोधत असतात. प्लास्टिकचे विघटन कसे करता येईल यावर जगभरात संशोधन सुरु आहे. सामान्य माणसांनाही यात खारीचा वाटा उचलता येऊ शकतो हे नाशिकच्या नाशिक एज्युकेशन सोसायटीने प्रत्यक्ष कृतीतून दाखवले आहे. यासाठी संस्थेच्या शाळांमध्ये विविध उपक्रम सातत्याने राबवले जातात. विद्यार्थी शाळेत येताना पाण्याची प्लास्टिकची बाटली आणत नाहीत.

- Advertisement -

सोमवार ते शुक्रवार विद्यार्थी त्यांच्या घरातील आणि शक्य झाल्यास परिसरातील प्लास्टिकचा कचरा गोळा करतात. तो कचरा कापडी पिशवीत भरुन शाळेत जमा करतात. जमा झालेला प्लास्टिकचा कचरा विकून निधी उभा केला जातो. त्यातून शाळेतील किमान 25 गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली जाते, असे संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी माध्यमांना सांगितले. वाढदिवसाला विद्यार्थी वर्गात चॉकलेट वाटप करतात. त्याच्या रॅपरचा कचरा वाढतच चालला होता. त्यावरही संस्थेने उपाय शोधला आहे. ज्याचा वाढदिवस आहे तो विद्यार्थी त्याच्या आवडीचे पुस्तक खरेदी करतो. वाचतो.

वाढदिवशी वर्गातील विद्यार्थ्यांना पुस्तक परिचय करुन देतो आणि ते पुस्तक शाळेच्या वाचनालयात जमा करतो. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजत असून वाचनालयही पुस्तकांनी समृद्ध होत चालले आहे, असे प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे. 2019-20 या वर्षात राज्यात साधारणत: 10 लाख टन ई-कचरा निर्माण झाल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात नमूद आहे. त्यापैकी केवळ एक हजार टन कचर्‍यावर पुनर्प्रक्रिया करण्यात आली आहे. पुण्यातील एका सामाजिक संस्थेने इ कचरा संकलन मोहिम सुरु केली आहे. ऑक्टोबर अखेरपर्यंत पुण्यातील वेगवेगळ्या भागात संस्थेतर्फे इ कचरा संकलित केला जाणार आहे. त्याचा पुनर्वापर करण्यावर संस्थेकडून भर दिला जातो.

गेल्या वर्षी संकलित करण्यात आलेल्या कचर्‍यामधील शक्य ती इलेक्ट्रॉनिक उपकरणे दुरुस्त करुन गरजू लोकांना देण्यात आल्याचे माध्यमात प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे. केंद्र शासनाकडूनही सुक्या कचर्‍यापासून खेळणी तयार करण्याची स्पर्धा सुरु आहे. कचर्‍यापासून खेळणी बनवण्याच्या नव्या कल्पना मांडणे यातून अपेक्षित असल्याचे शासकीय आदेशात म्हटले आहे.

उद्दिष्टपूर्ती होण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्वाचा असतो. लोकसहभागातून अनेक समस्यांवर व्यवहार्य उपाय योजले जाऊ शकतात. लोकसहभागातून सामुहिक शिक्षणदेखील होते. अनेकदा ‘समजते पण उमजत नाही’ अशी काहींची अवस्था असते. लोकसहभाग त्यांच्यासाठीही प्रेरणादायी ठरतो. त्यादृष्टीनेही वर उल्लेखिलेले उपक्रम अनुकरणीय आहेत. इतरेजन त्यापासून प्रेरणा घेतील आणि निदान आपापला परिसर कचरामुक्तीसाठी छोट्या छोट्या कृती अंमलात आणतील हीच आशा! 

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या