जगावेगळा हे विशेषण आपण सर्रास वापरत असलो तरी काही मोजकीच माणसे जगावेगळी असतात. त्यांच्यातले हे वेगळेपण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रमुख अंग असते. अनिलच्या बाबतीत तेच होते. मनात येईल त्या गोष्टीत मग्न होऊन जाणे हा त्याचा स्वभावपिंड होता. साधी राहणी हे त्याचे जीवनसूत्र होते.
डॉ.अनिल अवचट हा माझा गेल्या 50 वर्षांपासूनचा मित्र. आम्हा दोघांचेही वडील डॉक्टर. अनिल माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान. 1962 मध्ये आम्ही बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश केला आणि तेव्हापासून अनिल अवचट आणि कुमार सप्तर्षी ही जोडी लोकांच्या मनात ठसली. आमचे स्वतंत्र नाव घेतलेच जायचे नाही इतकी ही मैत्रीची वीण घट्ट होती. त्यावेळी सायकल हेच मुख्य वाहन असायचे. स्कूटर अजून बाजारात आली नव्हती. त्यामुळे सायकलवर बसून तो मला सोडायला यायचा, मी त्याला सोडायला जायचो असा तो काळ.
अनिलची पत्नी सुनंदा हीदेखील माझी वर्गमैत्रीण. आम्हा सर्वांचा त्यावेळी एक ग्रुपच होता. आम्ही तिथूनच एमबीबीएस झालो. पुढे युवक क्रांती दलाच्या स्थापनेमध्येही आम्ही साथीदार होतो. युक्रांदचा कलात्मक भाग अनिलचा होता, तर वैचारिक भाग माझा होता. 1972 पर्यंत अनिल युक्रांदमध्ये सक्रिय होता. त्यानंतर त्याने मला एकदा सांगितले की, मला युक्रांदचे नैतिक परिणाम, विचारधारा आदी सर्व गोष्टी मान्य आहेत, पण त्यातून निर्माण होणारी जी जबाबदारी आहे, संघटना, माणसे…यामध्ये माझे मन रमत नाहीये. यावर मीही ठीक आहे म्हणून त्याला मुक्त केले.
युक्रांदमधून बाजूला झाला असला तरी आमच्यात अंतर कधीच आले नाही. ‘युक्रांद’च्या चळवळीची पार्श्वभूमी त्याला सामाजिक विषयांवर लेखन करण्यासाठी उपयोगी पडली. कारण या चळवळीत काम करत असताना त्याला तळागाळातल्या समूहांचे दर्शन घडले. त्याच्या लेखनामध्ये या चळवळीच्या प्रेरणा आहेत, हे विसरून चालणार नाही.युक्रांदची स्थापना होण्यापूर्वी आम्ही साप्ताहिक दवाखाने चालवायचो.
त्यासाठी सुनंदा आणि अनिल यांना नांदेडसारख्या भागात आम्ही पाठवायचो. त्यातूनच त्यांच्यातले प्रेम जुळले आणि पुढे ते एकमेकांचे जीवनसाथी बनले.अनिलच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आले की, त्याला जबाबदारी फार गद्य वाटायची. त्या-त्या क्षणाला ज्यामध्ये मग्न व्हावेसे वाटतेय त्यात समरसून जायचे हा त्याचा स्वभावपिंड होता. ही बाब उमगल्यानंतर त्याला आम्ही सांगितले की, तुला जे आवडते ते तू कर.
विशेषतः यामध्ये सुनंदाचा वाटा फार मोठा होता. तिने त्याला सांगितले की, तुला ज्यामध्ये मग्न व्हायचे आहे त्यात तू मग्न राहा. बाकी आर्थिक, कौटुंबिक जबाबदार्या मी सांभाळते. मग त्याने शिल्पकला, चित्रकला, ओरिगामी या आधीपासूनच त्याच्यात असणार्या कलांना नवे आकाश दिले आणि त्या बहरत गेल्या. अनिलचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कोणतीही गोष्ट मग्न होऊन, मनापासून ओतून देऊन करायची.
त्यामुळेच त्याच्या डॉ. लेखणीलाही तेज होते. यदुनाथ थत्ते ‘साधना’चे संपादक असताना त्यांनी आम्हाला युक्रांदतर्फे एक सदर चालवा, असे सांगितले होते. ‘वेध’ नावाचे हे सदर अनिलच चालवायचा. यातून आमच्या विचारांचा प्रसारही होत असे. 1968 ते 1969 अशी वर्षभर ही लेखमाला चालली. भोवताली दिसणार्या छोट्या छोट्या विषयांवर तो लिहायचा. त्याचे लिखाण दुर्बोध नव्हते. सोप्या शैलीत लिहायचा, पण थेट काळजाला हात घालणारी शैली हे त्यातले वेगळेपण होते.
मला आठवतेय ‘वेध’मधला पहिला लेख ‘स्वच्छ पुणे की सुंदर पुणे’ हा होता. त्यावरून बरीच चर्चाही झाली होती. पुढे जाऊन अनिल ‘साधना’चा संपादकही बनला. पण राजा ढाले यांचा एक लेख ‘साधना’मध्ये प्रकाशित झाला आणि त्यातील काही मुद्यांवरून वादंग निर्माण झाले. या सर्वांमुळे तो या परिघाबाहेर गेला. पण या प्रसंगामुळे त्याच्या लक्षात आले की माणसांचा खेळ फार अवघड आहे. म्हणून आपल्याला जे वाटते ते करायचे. किंबहुना त्याची ती फिलॉसॉफीच बनली की, माणसाने स्वच्छंदी जगावे. प्रत्येक क्षण जिवंत जगायचा, असे त्याचे तत्त्वज्ञान होते. एखाद्या भाषणाला जरी तो गेला तरी चित्रे काढत बसायचा, ओरिगामी करत राहायचा.
या छंदांमधून, कलागुणांमधूनच त्याला परदेश दौर्याची संधी मिळाली आणि या कलांना व्यापकत्व आले.एकदा मी त्याला विचारले की, तुझ्या नेतृत्वाखाली मी जर एखादा सत्याग्रह सुरू केला आणि त्याच दिवशी जर भीमसेन जोशींचा गाण्याचा कार्यक्रम असेल तर तू काय करशील? तो पटकन म्हणाला, मी गाणे ऐकायला जाईन! साहजिकच संघटनेमध्ये असे चालत नाही. म्हणून मग आम्ही आनंदाने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. पण आमची मने सदैव जोडलेलीच राहिली. मध्यंतरी माझ्या मुलाचे लग्न झाले. त्यासाठी त्याला निमंत्रण दिले होते, पण तो आला नाही.
दुसर्या दिवशी आला आणि माझ्या सूनबाईंना बासरी वाजवून दाखवली, चित्रे काढून दाखवली. असे त्याचे आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व होते आणि मी ते स्वीकारले होते. त्यानेही माझे व्यक्तिमत्त्व स्वीकारलेले होते. आणखी एक प्रसंग मला सांगावासा वाटतो, ज्याचा अनिलच्या लेखनावर दूरगामी परिणाम झाला. एस. एम. जोशींनी मला एकदा विचारले की, बिहारमधील अत्यंत मागासलेला असलेल्या पूर्णिया जिल्ह्यामध्ये भूमीमुक्ती आंदोलनासाठी जायचे आहे, कुणाला पाठवशील? त्यावेळी मी अनिलला जायला सांगितले. तिथल्या विदारक, दाहक वास्तवाने तो हादरून गेला. पुण्याला परतल्यानंतर त्याने बर्याच दिवसांनी तिथले अनुभव लिहायला घेतले. ‘माणूस’मध्ये ते छापून आले.
त्यावरून ‘पूर्णिया’ हे त्याचे पहिले पुस्तक आकाराला आले. सोपी भाषा, सुटसुटीत वाक्ये, फोटोग्राफिक मेमरीने ते अनिलने लिहिले. बाबा आढाव यांच्या ‘एक गाव एक पाणवठा’ चळवळीत त्याने सहभाग घेतला होता. हमाल पंचायतीच्या कामात सहभागी झाल्यानंतर त्याने हमालांवर एक फार सुंदर लेख लिहिला. असा हा अवलिया. त्याच्या नशिबाने त्याला त्या-त्या क्षणी जे वाटते ते करायला मिळाले! भोवतालच्या आर्थिक, भौतिक जबाबदार्या कुणी ना कुणी पाहत गेले! यामुळे त्याला आपले एक वेगळे व्यक्तिमत्त्व आकारता आले आणि वेगवेगळ्या कलांमधून ते फुलत गेले. या सर्वांचा केंद्रबिंदू म्हणजे त्याचे साधे राहणे. त्याच्या अपेक्षा काहीच नसायच्या.
सच्चा निरपेक्ष म्हणून त्याची ओळख होती. अनिलचा भाऊ सुभाष अवचट हादेखील भावाच्या पावलावर पाऊल टाकत चित्रकलेमध्ये आला, पण तो कमर्शियल आहे. अनिलला कलेची प्रेरणा घरातून मिळाली. त्याची आई मोठमोठ्या रांगोळ्या काढायची.कुतूहल हा अनिलचा सर्वात मोठा प्लस पॉईंट होता. यातूनच त्याच्या लेखन कलेला बहर येण्यास वाव मिळाला. पूर्णिया, माणसं, कोंडमारा, धागे आडवे उभे, प्रश्न आणि प्रश्न, संभ्रम, धार्मिक अशी जवळपास 38 पुस्तके अनिलने लिहिली.
लेखनातून तो सर्वांचा लाडका झाला. कारण ही सर्वच पुस्तके नुसती वाचनीय नव्हती तर अंतर्मुख करायला लावणारी होती. जगण्यातील गुंतागुंत दर्शवणारी होती.साधारण महिन्याभरापूर्वी अनिलचे आणि माझे बोलणे झाले होते. फोनवर तो म्हणाला होता, अरे, आपण आता अशा टप्प्यावर आहोत की कधीही निरोप घ्यावा लागू शकतो. तेव्हा आपण भेटले पाहिजे. मीही तत्काळ सांगितले की, अरे, नक्कीच! पण मला तुझ्याकडचे जिने चढता येत नाहीत. यावर तो म्हणाला, ‘अरे, मग मी येतो’. पण ती भेट झालीच नाही.
डॉ. कुमार सप्तर्षी, ज्येष्ठ विचारवंत