नाशिक | जिमाका वृत्तसेवा Nashik

केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ५० अन्वये सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविणे बंधनकारक करण्यात आले असून, वाहनधारकांनी ३० जून २०२६ पर्यंत एच.एस.आर.पी. बसवून घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
प्रादेशिक परिवहन अधिकारी शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांवर एच.एस.आर.पी. बसविण्यासाठी यापूर्वी विविध मुदत देण्यात आल्या होत्या. परिवहन आयुक्त कार्यालयाने वाहनधारकांच्या सोयीसाठी मुदतवाढ देत एच.एस.आर.पी. बसविण्याची अंतिम मुदत ३० जून २०२६ पर्यंत निश्चित केली आहे.
एच.एस.आर.पी. न बसविलेल्या वाहनांचे कर्ज उतरविणे किंवा चढविणे, वाहन हस्तांतरण, पुनर्नोंदणी, वाहनातील बदल नोंद करणे तसेच परवाना नूतनीकरण यांसारखी अनेक कामे यापूर्वीच थांबविण्यात आली आहेत. तसेच, १ जुलै २०२६ पासून एच.एस.आर.पी. नसलेल्या सर्व जुन्या व नव्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, ३० जून २०२६ पर्यंत एच.एस.आर.पी. बसविण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावरून अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनधारकांवर कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
वाहनधारकांनी मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई टाळण्यासाठी तसेच वाहनांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्वरित एच.एस.आर.पी. बसवून घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शिंदे यांनी केले आहे.




