Wednesday, October 21, 2026
Homeब्रेकिंग न्यूज२० लाख विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची होणार तपासणी; गरजू विद्यार्थ्यांना नंबरचे चष्मे मोफत उपलब्ध...

२० लाख विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची होणार तपासणी; गरजू विद्यार्थ्यांना नंबरचे चष्मे मोफत उपलब्ध करून देणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय करार

- Advertisement -

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

राज्यातील शासकीय शाळांमधील इयत्ता पाचवी ते दहावीच्या सुमारे २० लाख विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी करण्यासाठी विशेष प्रकल्प राबविण्यात येणार आहे.तपासणीनंतर दृष्टीदोष आढळलेल्या गरजू विद्यार्थ्यांना नंबरचे चष्मे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अलीकडेच शालेय शिक्षण विभाग, रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि वनसाईट एस्सिलार लक्सोटिका फाउंडेशन यांच्यामध्ये त्रिपक्षीय करार करण्यात आला.

या करारानुसार राज्यातील शासकीय शाळांमधील पाचवी ते दहावीच्या २० लाख विद्यार्थ्यांच्या डोळ्याची तपासणी करण्यासाठी विशेष प्रकल्प राबविण्यात येणार आहे. शालेय शिक्षण विभागामार्फत या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येईल. रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट प्रकल्प अंमलबजावणी भागीदार म्हणून कार्य करणार असून वनसाईट एस्सिलार लक्सोटिका फाउंडेशन तांत्रिक भागीदार म्हणून कार्यरत राहील. दृष्टीदोष असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना मोफत चष्मे उपलब्ध करून देण्याची जबाबदारीही ही संस्था घेणार आहे.

या कराराचा कालावधी ३६ महिन्यांचा राहणार आहे. या कालावधीत राज्यभरात डोळे तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येईल. प्रकल्पाच्या प्रगतीचे नियमित परीक्षण आणि मूल्यमापन करण्यात येणार असून त्रैमासिक प्रगती अहवालाद्वारे तपासणी शिबिरांची संख्या, लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या, चष्मा वितरण आणि अन्य बाबींचा आढावा घेतला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी आवश्यक माहितीचे वैज्ञानिक पद्धतीने संकलन करण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक माहितीसंदर्भातील गोपनीयता आणि डेटा संरक्षणाच्या तरतुदींनाही करारामध्ये विशेष स्थान देण्यात आले आहे.

यापूर्वी २०१९ पासून या उपक्रमाद्वारे १८ जिल्ह्यांतील ८०० शाळांमधील ६ लाख ८० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली असून ६३ हजारांहून अधिक चष्मे पुरविण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या आजारांचे आणि तक्रारींचे वेळेत निदान आणि त्यावर उपचार होण्यास मदत होणार आहे.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या कराराप्रसंगी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल यांच्यासह रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त राजीव मेहता, वनसाईट एस्सिलार लक्सोटिका फाउंडेशनचे संचालक वेणू अंबाती आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

…तर भविष्यात बिश्नोईच्या नावाने राजकीय नेत्यांच्या हत्या होतील, राऊतांचा खळबळजनक दावा

0
मुंबई । Mumbai देशाच्या राजकारणात आणि गुन्हेगारी जगतात सध्या 'लॉरेन्स बिश्नोई' या नावाभोवती अनेक चर्चा रंगल्या आहेत. मात्र, याच नावाचा वापर करून देशात मोठा राजकीय...