Friday, March 28, 2025
Homeमनोरंजनअमृता फडणवीसांच्या गाण्यावरून मराठी कलाकारांमध्ये 'फेसबुक वॉर'

अमृता फडणवीसांच्या गाण्यावरून मराठी कलाकारांमध्ये ‘फेसबुक वॉर’

मुंबई | Mumbai

विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांचं एक नवं गाणं रसिकांच्या भेटीस आलं आहे. भाऊबीजेच्या निमित्ताने त्यांनी हे गाणं गायलं आहे. या गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हे गाणं पाहून काही नेटकऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त करत अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली. या टीकाकारांमध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता महेश टिळेकर देखील आहेत. “गायी म्हशीच्या हंबरण्याचा आवाज एकवेळ लोक सहन करतील पण हा आवाज सहन होत नाही”, असं म्हणत त्यांनी अमृत फडणवीस यांना खरंच गाता येतं का? सवाल केला आहे. महेश टिळेकर (Mahesh Tilekar) यांच्यावर अभिनेता आरोह वेलणकर (Aroh Welankar) यानं टीका केली आहे. टिळेकर यांनी देखील आरोहला कडवट शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.

- Advertisement -

अभिनेता आरोह वेलणकरने महेश टिळेकर यांच्यावर टीका करत म्हंटल आहे की, “महेश टिळेकर तुमची टीका वाचून लाज वाटली. मराठी तारका नावाचा कार्यक्रम करता, स्त्री शक्ती, सम्मानाच्या गोष्टी करता, आणि ही कसली भाषा तुमची? नसेल आवडत तर नका एैकू, टीका करायची तर तमा बाळगून करा! कोण समजता तुम्ही स्वत:ला!? ह्या आधी व्हाया व्हाया माझ्यावरही आणि काही नटांवर तुम्ही अशीच टीका केली होती, तेव्हा दुर्लक्ष केलं. तुम्ही तुमच्या पोस्ट काय विचार करून, ओढून, पीऊन, समजून करता हे कळणं कठीण आहे! फुटेजसाठी करत असाल तर अधिकच हीन आहे तुमचं सगळं! सुधरा… राहीला प्रश्ण मराठी तारकांचा, तर ह्या पुढे ह्या तुमच्या स्टंटमुळे तुमच्या कार्यक्रमात कोण काम करतय बघू!”

आरोहच्या या टिकेला महेश टिळेकर यांनी देखील सडकून टिका केली आहे. महेश टिळेकर यांनी म्हंटल आहे की, “आरोह वेलणकर बेसूर ,गाणारी स्वयंघोषित गायिका, जिच्यावर मी पोस्ट लिहिल्यामुळे तुझा थयथयाट होऊन तू मला धमकी वजा संदेश देतोय,तुझ्या बापाची मालकी आहे की राज्य आहे इथ, कोण माझ्याकडे कार्यक्रम करणार म्हणून तू धमकी देऊन मला सांगतोय.कलाकार तुझ्या दावणीला बांधले आहेत की त्यांचं पालकत्व घेतलं आहेस म्हणून तुझ्या सांगण्यावरून कलाकार ऐकणार.. आधी स्वतः चे करिअर बघ. आणि फुटेज पब्लिसिटी मिळवण्यासाठी तूच बिग बॉस मध्ये गेला होतास ना?का तिथे समाजसेवा करायला गेला होतास?ज्या कलाकारांच्या वर टीका केली तेंव्हा का तू बिळात जाऊन बसला होतास?ते तुझे समविचारी दिसतायेत म्हणून तुला मिरच्या झोंबल्या का? जेव्हा मराठी कलाकारांची लायकी ट्रेन नी फिरण्याची आणि गाय छाप तंबाखू खाण्याची आहे असं विधान तू ज्यांचा भक्त आहेस त्या राजकीय पक्षाच्या व्यक्तीने केले होते तेंव्हा तुझे रक्त उसळले नाही का?तेंव्हा कलाकारां ची बाजू घेऊन बोलायला पुढं का आला नाहीस रे?कुठं पिऊन पडला होतास की शेपूट घालून बसला होतास? तुझं वय जितकं आहे ना तितकी माझी कारकीर्द आहे. आता तुझा जळफळाट होतोय तेंव्हा कुठं गेला होतास रे तु,जेंव्हा छत्रपती शिवाजी महाराज, मराठी भाषा , महापुरुषांचा, महाराष्ट्राचा, मुंबई पोलिसांचा अपमान इतर कलाकार करत होते तेंव्हा तू आईच्या पदराआड लपला होतास की मूग गिळून गप्प बसला होतास? स्त्री सन्मान आणि कला सन्मान यातला आधी फरक ओळखायला शिक.जे बेसूर आहे त्याला अमृतवाणी समजून डोक्यावर घेनाऱ्यातला मी नाही.आणि आठवत नसेल तर नीट आठव पुण्यात हनुमंत गायकवाड यांच्या ऑफिस मध्ये भेटून तू माझ्या कडे काम मागत होतास,ते विसरलास का?जिथं बोलायचं तिथं बोलतो मी ,आणि तुझ्यात खरीच हिम्मत असेल तर समोर येऊन धमकी दे म्हणजे माझी पोस्ट वाचून जी आग आणि धूर बाहेर येत आहे तो तुझ्या शरीरातील नेमका कोणत्या अवयवा मधून बाहेर येत आहे ते पाहून तुझं बिन टाक्याचे ऑपरेशन करायचे की टाके घालून ते मला ठरवता येईल.”

काय म्हंटलं होत महेश टिळेकरांनी ?

महेश टिळेकर यांनी फेसबुकवर पोस्ट करत म्हंटल होत की, “हिला नको गाऊ द्या. चांगला आवाज असूनही केवळ नाव नाही हाती भरपूर पैसा नाही म्हणून नवीन गायकांना कुणी मदतीचा हात देऊन संधी देणारा पाठीशी उभा राहत नाही. सुमधुर आवाज असलेल्या महाराष्ट्रातील अनेक नवीन गायकांना साधी कुठं संधी मिळत नाही पण जिचा आवाज ऐकला की कानाचे पडदे फाटण्याची भीती निर्माण होते ,लाखो तरुणांच्या ह्रदयात धडकी भरते आणि गाणं हे दुसऱ्याला आनंद देण्याऐवजी दुःख देण्यासाठीच गायले जाते असा समजच होण्याची शक्यता निर्माण होते अशी एक आपल्याच विश्वात धुंद होऊन गाणारी विश्र्वगायिका लोकांना सातत्याने का छळत आहे? गायी म्हशीच्या हंबरडण्याचा आवाज एकवेळ लोक सहन करतील पण या गायिकेचा आवाज ऐकून तिच्या आवाजाला अनेकांनी शब्दरुपी श्रद्धांजली वाहिली तरीही ही स्वयंघोषित गायिका मी पुन्हा गाईन मी पुन्हा गाईन म्हणत आपल्या गळ्याचा व्यायाम थांबवायचे नाव घेत नाही. आपल्याकडे जुनी म्हण आहे ” आडात नसेल तर पोहऱ्यात येणार कुठून? केवळ ह्या अश्या गायिकेला प्रोमोट करण्यासाठी तिला प्रसिद्धीच्या झोतात ठेवण्यासाठी टी सिरीज सारखी, नेहमीच बिझिनेसला प्राधान्य देणारी कंपनी का पैसा खर्च करत आहे,?त्यामागे काय लागेबांधे आहेत ? हे एक न सुटणारे कोड आणि जर ह्या गायिके कडे स्वतःचा अतिरिक्त खूपच पैसा असेल तर तिने एखादं संगीत विद्यालय सुरू करून नवोदित गायकांना चांगल्या संगीत शिक्षकांचे मार्गदर्शन होईल यासाठी स्वतः न गाता फक्त संगीत सेवा करावी. पण काहीही म्हणा लता मंगेशकर यांनी गायलेल्या ” आज अमृताचा घनु..या ओळीतील अमृता हा शब्द लता दीदींच्या मुखातून ऐकायला आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या ओवितून वाचायलाच योग्य वाटतो.इतरांनी फक्त त्या अमृता नावाची किमान लाज राहील याचा तरी प्रयत्न करावा.”

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या गांधीनगर जवळील विजय ममता चित्रपटगृहाजवळ ट्रॅक्टरची वाहतूक करणाऱ्या ट्रकची एका तरुणाला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात एक युवक...