नाशिक । प्रतिनिधी Nashik
रस्त्यावरील जखमी प्राण्यांसाठी विल्होळी येथील जुन्या जकात येथे असलेल्या शरण फॉर अॅनिमल ही संस्था कार्यरत असून पुरेशा देणगी अभावी संस्थेला अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शरण फॉर अॅनिमल या प्राणी मित्रांच्या संस्थेच्या शरण्या शेट्टी यांच्यासह त्यांचे सहकारी गेल्या अनेक वर्षांपासून नाशकातील जखमी प्राण्यांना सेवा देण्याचे कार्य करत आहेत. सध्या संस्थेत 102 श्वान,23 मांजर,60 गायी, 6 वराह ,5 बकर्या, घोडे, गाढव असे शेकडो जखमी प्राण्यांवर उपचार करण्यात येत असून यातील अनेक प्राण्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असली तरी त्यांना मोकळ्यावर सोडून देता येत नसल्याने संस्थेतर्फे त्यांची काळजी घेतली जात आहे.
या सर्व प्राण्यांना खाद्याची व्यवस्था ही संस्थेतर्फे केली जात असली तरी पुरेशा देणगीअभावी संस्थेला प्राण्यांच्या खाद्याच्या खर्चासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. पुरेशा देणगीअभावी संस्थेला प्राण्यांचा खाद्याचा खर्च करणे अवघड जात आहे. रस्त्यावर अपघातात जखमी जनावरांची किंवा प्राण्यांच्या आपापसातील भांडणात जखमी प्राण्यांना इलाजासाठी संस्थेला फोन आल्यास संस्थेच्या अॅम्ब्युलन्सद्वारे प्राण्यांना विल्होळी येथील केंद्रावर आणले जाते त्यानंतर त्यांच्यावर इलाजापासून ते खाद्याचा सर्व खर्च संस्थेतर्फे केला जातो.
यामध्ये मालकांनी रस्त्यावर सोडून दिलेल्या जनावरांचा देखील समावेश आहे. या प्राण्यांना देखभालीसाठी प्राणी मित्रांची देखील मोठ्या प्रमाणावर मदत होते. सध्या पुरेशा देणगीअभावी संस्था प्राण्यांना रोज दिल्या जाणार्या खाद्यासाठी तारेवरची कसरत करत असून याकरिता देणगीदारांची आवश्यकता असल्याचे संस्थेच्या शरण्या शेट्टी यांनी सांगितले. देणगीदारांनी संस्थेच्या ठिकाणी भेट द्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.