नागपूर । Nagpur
मागील आठवड्यात नागपूर शहरातील महाल भागात झालेल्या मोठ्या हिंसाचारानंतर या प्रकरणातील मुख्य सूत्रधार फहीम खानच्या घरावर नागपूर महापालिकेने आज (१६ मार्च) बुलडोझर चालवण्याची कारवाई सुरू केली. नागपूर महापालिकेच्या पथकाने नोटीस बजावल्यानंतर फहीम खानच्या घरातील सर्व सामान काढून टाकण्यात आले असून, घर पूर्णतः रिकामे करण्यात आले आहे.
या हिंसाचाराची सुरुवात औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून झाली. सोशल मीडियावर अफवा पसरवण्यात आल्या आणि दोन गट आमने-सामने आले. महाल भागात मोठ्या प्रमाणात दगडफेक, तोडफोड आणि आगजनी झाली. वाहनं फोडण्यात आली, त्यांना आग लावण्यात आली. जमावाने पोलिसांवर आणि आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांवर हल्ला केला. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर अनेक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान जखमी झाले. एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग देखील करण्यात आल्याची गंभीर घटना घडली.
या संपूर्ण हिंसाचार प्रकरणात फहीम खान हे मास्टरमाइंड असल्याचे तपासात समोर आले आहे. फहीम खान सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर देशद्रोहासह गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. नागपूर महापालिकेने त्याच्या घरावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
फहीम खानच्या यशोदा नगर येथील निवासस्थानावर आज सकाळपासूनच बुलडोझर कारवाई सुरू करण्यात आली. हे घर EWS अंतर्गत नागपूर इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट (NIT) मार्फत ३० वर्षांच्या भाडेतत्त्वावर त्याच्या कुटुंबाला देण्यात आले होते. घराची नोंदणी फहीम खानच्या आईच्या नावावर आहे. महापालिकेने या घरावर अनधिकृत बांधकाम असल्याचे कारण पुढे करत नोटीस बजावली होती. नोटीस मिळाल्यानंतर फहीम खानच्या कुटुंबीयांनी घर रिकामे केले. महापालिकेचे अधिकारी, पोलीस बंदोबस्तासह सकाळी यशोदा नगर भागात दाखल झाले आणि कारवाईला सुरुवात केली.
दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर हिंसाचार प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत दिले होते. त्यांनी सांगितले होते की, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांकडून नुकसानभरपाई वसूल केली जाईल आणि कोणतीही सूट दिली जाणार नाही. त्यानंतर महापालिकेच्या कारवाईस गती मिळाली.
फहीम खान कोण आहे?
फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी)चा नागपूर शहराध्यक्ष आहे. त्याचे शिक्षण दहावीपर्यंत झाले असून, वय ३८ वर्षे आहे. फहीम खानने एकदा लोकसभा निवडणूक लढवली होती, ज्यात त्याला १,०७३ मते मिळाली होती. सध्या त्याच्यावर जमाव जमवून हिंसाचार घडवून आणल्याचा, देशद्रोहाचा आणि सार्वजनिक मालमत्तेच्या नाशाचा आरोप आहे.