Friday, December 6, 2024
Homeनगरबनावट अकाउंटद्वारे केली जाते बदनामी

बनावट अकाउंटद्वारे केली जाते बदनामी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महिला, मुलींच्या नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्याद्वारे त्यांची बदनामी केली जात आहे. अलिकडच्या काळात येथील सायबर पोलीस ठाण्यात अशा तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. इंस्टाग्रामवर युवतीच्या नावे दोन बनावट अकाउंट तयार केले. तिच्या फोटोचा गैरवापर करून बदनामी केल्याप्रकरणी शनिवारी येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बदनामीसाठी जवळची व्यक्ती किंवा सोशल मीडियावर फ्रेंड असलेल्या व्यक्तींकडून अशी बदनामी केली जात असल्याचे आतापर्यंतच्या तपासातून निष्पन्न झाले असल्याचे सायबर पोलिसांनी सांगितले.

- Advertisement -

सोशल मीडियाचा चांगला उपयोग होत असला तरी त्याचा दुरुपयोग करणारी मंडळी मोठ्या प्रमाणात आहेत. एखाद्या सोबत असलेल्या दुश्मनीचा बदला घेण्यासाठी जवळची व्यक्तीच सोशल मीडियावरील फोटो, नावाचा गैरवापर करून बनावट अकाउंटच्याआधारे बदनामी करत आहे. अशीच एक घटना मागील महिन्यात पारनेर तालुक्यात घडली होती. यासंदर्भात सायबर पोलिसांत फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास केला असता फिर्यादी महिलेच्या गावातीलच अल्पवयीन मुलाने इंस्टाग्रामवर बनावट अकाउंट तयार करून महिलेच्या फोटोचा गैरवापर करत बदनामी केली होती.

शनिवारी अहमदनगर शहरात राहणार्‍या एका युवतीने फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या फोटोचा वापर करून त्यांच्या नावे इंस्टाग्रामवर दोन बनावट अकाउंट तयार करण्यात आले. त्या अकाउंटवरून फिर्यादीची बदनामी करण्यात आली. 28 फेब्रुवारी, 2022 च्या पूर्वी ही घटना घडली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पीडित महिलेने शनिवार, 26 मार्च, 2022 रोजी सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपीविरूध्द भादंंवि. कलम 500 सह आयटी अ‍ॅक्ट 66 प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे.

अशी होते बदनामी

आपण सोशल मीडियावर आपल्या नावे अकाउंट तयार करतो. ते अकाउंट प्रायव्हसी ठेवले जात नाही. तसेच त्या अकाउंटवर डिपीसह इतर फोटो टाकले जातात. ते सार्वजनिक असल्याने नेमके सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या व्यक्तींकडून त्या फोटोचा व आपल्या नावाचा गैरवापर करून बनावट अकाउंट तयार केले जाते. त्या अकाउंटवरून बदनामी केली जाते. असे कृत्य करणारी व्यक्ती ही जवळची कोणी असू शकते,अशी शक्यता सायबर पोलिसांनी व्यक्त केली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या